पुणे, 27 ऑक्टोबर: दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रासह देशात किमान तापमानात (Temperature in Maharashtra) काही अंशी घट झाली आहे. राज्यात पुढील चार दिवस कोरडं हवामान (Dry weather) राहणार असून कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतील, असा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) व्यक्त करण्यात आला आहे. सध्या राज्यात दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार असून थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, देशातून मान्सूनने माघार घेताच पुण्यात किमान तापमानाचा (Temperature in pune) पारा घटला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पहाटे वातावरणात थंडी वाढताना दिसत आहे. आज पुण्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेला होता. आज पुण्यात एनडीए परिसरात सर्वात कमी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ, माळीण (14.4), पाषाण (14.6) आणि हवेली (14.9) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उर्ववरित पुणे परिसरात किमान तापमान 15 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
Pune Min temp today morning, 27 Oct. Temp below 15°C at isolated places... pic.twitter.com/F8qhcodvmN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 27, 2021
गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. बुधवारी सकाळपर्यंत राज्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. रत्नागिरी जिल्ह्यात 35.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान तर महाबळेश्वरमध्ये 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रावर वाहणारे वारे भिन्न आद्रतेसह वेगवेळ्या दिशेनं वाहत आहेत. यामुळे उत्तरेकडील थंडीचा विशेष परिणाम अद्याप महाराष्ट्रात जाणवत नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
हेही वाचा-COVAXIN ला काही तासांत मंजुरी मिळण्याची शक्यता, लवकरच येऊ शकते GOOD NEWS
याशिवाय, बंगालच्या उपसागरात मात्र चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही तासांत याठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील पुढील काही दिवसात ओडिशा आणि पूर्व किनारपट्टीवरील काही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र