हैदराबाद, ०६ फेब्रुवारी २०१९- तेलगू टीव्ही अभिनेत्री नागा झांसीने बुधवारी हैदराबाद येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या २१ व्या वर्षी नागाने आत्महत्या केली. श्रीनगर येथील राहत्या घरी तिचं पार्थिव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलं.
पोलिसांच्या मते, नागा तेव्हा घरात एकटी होती. तिचा भाऊ दुर्गा प्रसादने दरवाजा वाजवला तेव्हा आतमधून कोणताही आवाज आला नाही. यानंतर दुर्गा प्रसादने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. सगळ्यांनी मिळून दरवाजा तोडला तेव्हा नागाचं पार्थिव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसलं.
शवविच्छेदनासाठी अभिनेत्रीचं पार्थिव गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं असून पंजगट्टा पोलीस ठाण्यात आत्महत्येविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्या झांसीने ‘मा’ टीव्ही वाहिनीवर येणाऱ्या ‘पवित्र बंधन’ मालिकेशिवाय अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
ती गेल्या काही महिन्यांपासून अमीरपेट परिसरात स्वतःचं ब्युटीपार्लर चालवत होती. झांसीच्या नातेवाईकांच्या मते, तिचं एका मुलावर प्रेम होतं. असं म्हटलं जातं की, तो मुलगा नागाचा दूरचा नातेवाईक होता.
रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून नागा नैराश्यग्रस्त होती. प्रेमभंगामुळे नागाने आत्महत्येचं पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या नागाचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून तिचा कॉल डेटा आणि चॅट रेकॉर्ड तपासण्यात येत आहे.
Special Report : प्रशांत किशोर ठरणार का युतीचे नवे चाणक्य?