मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. आता सीबीआयने बांद्रा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि सुशांतसिंह प्रकरणाचे तपास अधिकारी भूषण बेलनेकर यांना समन्स बजावलं आहे. जबाब देण्याकरता हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र भूषण बेलनेकर यांना 11 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचे तपास अधिकारी भूषण बेलनेकर हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र अशातच सीबीआयकडून त्यांना जबाबासाठी समन्स देण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचे हँड ओव्हर करण्याकरता बेलनेकरांच्या सह्या लागणार आहेत.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयचा संशय
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हातात गेल्यानंतर सर्वात आधी सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली? या अँगलने तपास करण्यात येत होता. मात्र त्यानंतर सुशांतचा मृत्यू कसा झाला हे तपासण्यासाठी सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या घरी नाट्यरुपांतर केले. पण आता तर आर्थिक कारणांमुळे सुशांतचा मृत्यू झालाय का? या दिशेने सीबीआय तपास करताना पाहायला मिळत आहे. कारण सीबीआयने नोंदवलेल्या जबाबात सुशांतच्या मृत्यू मागे आता आर्थिक कारण असू शकते असा संशय सीबीआयला आहे.
रिया सतत कोणाच्या संपर्कात होती?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी CBIच्या तपासाने आता वेग पकडला आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती भोवती फिरत आहे. रिया ही सुशांतचा मॅनेजर सॅम्युएलच्या सतत संपर्कात होती असं आता स्पष्ट होत आहे. सीबीआयने रिया आणि सॅम्युलच्या फोन्सचे डिटेल्स CDR मिळवला असून त्यातून ही गोष्ट पुढे आली आहे. आता त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याचं गुपीत उलगडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.