मुंबई, 25 जानेवारी: असं म्हणतात की, एक स्त्री नेहमी यशस्वी पुरुषाचीच निवड करते. मात्र, काहीजणी याला अपवाद असतात. त्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीलाच यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्याबाबतीत हेच घडलं आहे. प्रेम ही सर्वांत जास्त सामर्थ्य असलेली भावना आहे. एखाद्या व्यक्तीसाठी प्रेम प्रेरणादायी ठरू शकतं किंवा घातकही ठरू शकतं. आयपीएस मनोज शर्मा यांच्या बाबतीत प्रेमानं सकारात्मक भूमिका बजावली. त्यांची तत्कालीन प्रेयसी आणि आताची पत्नी श्रद्धा शर्मा मनोज यांच्या प्रेरणास्रोत ठरल्या. कधीकाळी इयत्ता 12 वीची परीक्षा नापास झालेल्या मनोज यांना श्रद्धानं अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आपल्या प्रेयसीचा आपल्यावरील विश्वास साध्य करण्यासाठी मनोज यांनी जीवापाड मेहनत केली आणि ते आयपीएस अधिकारी झाले. ‘झी न्यूज’नं या बाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तुमच्या जॉब अप्लिकेशनसोबत Cover Letter नसेल तर नोकरी मिळत नाही? एक्सपर्ट्सनी दिलं परफेक्ट उत्तर
मनोज शर्मा यांनी 'बारावी नापास' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग लिहिले आहेत. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मनोज यांच्यावर कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी होती. घरची परिस्थिती इतकी बिकट होती घराला चांगलं छप्परदेखील नव्हतं. अशा परिस्थितीत एकेदिवशी प्रशासकीय अधिकारी होता येईल, याची कल्पना करणंही कठीण होतं.
मनोज शर्मा यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुरैना येथे झाला. दैनंदिन गरजा भागवता येतील इतकीच कमाई त्यांच्या पालकांना मिळत असे. त्यांच्या वडिलांचे नाव रामवीर शर्मा असून त्यांना एक भाऊ आणि एक बहीणदेखील आहे. मनोज यांना लहानपणापासूनच उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) व्हायचं होतं. कारण, आपल्यात प्रशासकीय अधिकारी होण्याचे गुण आहेत, याची त्यांना जाणीव होती. मात्र, इयत्ता 9 वी आणि 10 वी मध्ये त्यांना चांगले गुण मिळाले नाहीत. आपण चांगले विद्यार्थी नाही, असा मनोजचा समज झाला. बारावी बोर्डाच्या परीक्षेत हिंदी विषय सोडून इतर सर्व विषयांत नापास झाल्यामुळे तर याची त्यांना खात्रीच पटली. प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असलेल्या कोणत्याही इच्छूक मुलासाठी ही सर्वांत लाजिरवाणी बाब होती.
12वी नापास झाल्यानंतर मनोज यांनी ग्वाल्हेर गाठलं आणि उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रिक्षा चालवण्याचं काम करत असताना त्यांनी पुन्हा बारावीच्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास केला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेत यूपीएससीची तयारी केली. मनोज कुमार शर्मा यांनी ग्वाल्हेरच्या महाराणी लक्ष्मीबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एक्सलन्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा काळात ते कधी-कधी मंदिरात भिकाऱ्यांसोबत झोपायचे आणि उदरनिर्वाहासाठी लोकांच्या कुत्र्यांना फिरवण्याचं कामही करायचे. परिस्थिती हालाखीची असूनही त्यांनी नागरी सेवा परीक्षा पास होण्याची आशा सोडली नाही.
या कठीण परिस्थितीमध्ये श्रद्धा ही एकमेव व्यक्ती त्यांच्यासोबत होती. श्रद्धाची इच्छा होती की मनोज यांनी यूपीएससी सीएसई पास व्हावं. मनोज यांना पहिल्या तीन प्रयत्नांत यश मिळू शकलं नाही. पण, श्रद्धा यांनी त्यांना खचू दिलं नाही. त्या सतत मनोज यांना मानसिक आधार देऊन प्रेरणा देत राहिल्या. शेवटी चौथ्या प्रयत्नात 2005 मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन मनोज आयपीएस अधिकारी बनले. मनोज शर्मा आणि श्रद्धा जोशी शर्मा आजकालच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. स्वप्न पाहण्याचं धाडस केलं आणि जोडीदाराची भक्कम साथ मिळाली तर यश मिळवता येतं, हे मनोज शर्मा यांच्या गोष्टीतून सिद्ध होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.