मुंबई, २० एप्रिल- 'स्टूडंट ऑफ दी इअर २' सिनेमाचे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, हा एक मनोरंजनात्मक सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी फार डोकं लावू नये. गेल्या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी कलाकारांचं कौतुक केलं तर काहींनी ट्रेलरला नावं ठेवली. वास्तवाशी या सिनेमाचा काहीही संबंध नसल्याच्या कमेंट अनेकांनी केल्या.
नुकतेच सिनेमातील पहिले गाणे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यावेळी सिनेमाबद्दल बोलताना अनन्या म्हणाली की, ‘प्रेक्षकांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून हा सिनेमा पाहिला पाहिजे. हा पूर्णपणे एण्टरटेनमेन्ट देणारा सिनेमा आहे.’
तर सिनेमाचा मुख्य अभिनेता टायगर श्रॉफ म्हणाला की, ‘हा आजच्या तरुणाईचा सिनेमा आहे. प्रत्येकासाठी हा सिनेमा मनोरंजनात्मक असेल यात काही वाद नाही. तसेच सिनेमा पाहताना फार डोकं लावू नका.’
आर.डी बर्मन यांच्या गाण्याचं रीमिक्स
सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. आर.डी. बर्मन यांच्या ये जवानी है दीवानी गाण्याचं रीमिक्स केलं आहे. या नव्या गाण्यात अनन्या, तारा आणि टायगर दिसत आहेत. गाण्याबद्दल बोलताना अनन्या म्हणाली की, ती आणि तारा टायगरसोबत डान्स करण्यापूर्वी प्रचंड घाबरल्या होत्या. टायगर किती उत्कृष्ट नाचतो हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. नेमकी याच गोष्टीचं दडपण त्या दोघींना होतं.