विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : दुष्काळानं पिचलेल्या बळी राजासमोर असलेली संकटांची मालिका काही थांबताना दिसत नाही. पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकं डोळ्यादेखत वाळून गेली. पण, बळीराजावर झालेली निसर्गाची अवकृपा अशीच राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार आहे. त्यामुळे 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गारपीटीची देखील शक्यता?

पावसासह काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर, आठवडाभर वातावरण ढगाळ राहिल असं देखील तज्ज्ञांचं मत आहे.

कृषी विभागाचे आव्हान

शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

बळीराजावर संकट

पावसानं ओढ दिल्यानं हाताशी आलेली पिकं गेली. त्यामुळे आता रब्बी पिकं तरी हाताशी येतील या आशेवर सध्या बळीराजा आहे. पण, हवामानाचा लहरीपणा पाहता पुढील काही दिवस बळीराजासाठी चिंतेचेच आहेत.

पाण्यासाठी वणवण

पावासाअभावी सध्या राज्यात दुष्काळ आहे. विहीर, नदी, नाले, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे. सरकारनं देखील दुष्काळ जाहीर करत लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Special Report : अशी झाली युती


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या