मुंबई, 22 फेब्रुवारी : सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच आता शिक्षकांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या साथीनं आता शिक्षकांना देखील त्याला लाभ मिळणार आहे. पाचव्या वेतन आयोगाचा फायदा शिक्षकांना सहा महिन्यानंतर तर, सहाव्या वेतन आयोगाचा फायदा हा चार महिन्यानंतर मिळाला होता. पण, राज्यभरातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या साथीनं मिळणार आहे. 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 30 नोव्हेंबरला केली होती. शासन निर्णयामुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये देखील भाजपला याचा फायदा होऊ शकतो. सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले होते.त्यानंतर अखेर हिवाळी अधिवेशनामध्ये 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करत असल्याची घोषणा सरकारनं केली होती.
२१ हजार ५३० कोटींचा बोजा
सातव्या वेतन आयोगामध्ये सर्वसाधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार आहे. 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना याचा लाभ होणार आहे. यामुळे दरवर्षी जवळपास २१ हजार ५३० कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.