श्रेयाच्या हस्ताक्षराने जयंत पाटीलही भारावले.. म्हणाले, 'व्वा श्रेया! किप इट अप'

श्रेयाच्या हस्ताक्षराने जयंत पाटीलही भारावले.. म्हणाले, 'व्वा श्रेया! किप इट अप'

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी श्रेया गोरक्षनाथ सजन हिचे हस्ताक्षरचे एक पान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

सांगली,6 फेब्रुवारी:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या सोनगावमधील कडूवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी श्रेया गोरक्षनाथ सजन हिचे हस्ताक्षरचे एक पान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण श्रेयाचे हे अक्षर पाहून त्या सुंदर अक्षराच्या प्रेमात पडले आहेत. यामध्ये राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचाही समावेश आहे. श्रेयाचे मोत्या गत असलेले अक्षर पाहून जयंत पाटीलही अवाक् झाले आहेत. त्यांनी थेट श्रेयाला पत्रच लिहिले आणि तिचे तोंडभरून कौतुक केले.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावरील बारीकसारीक गोष्टींवर जयंत पाटील यांची नजर असते. कुणी स्पर्धेत उत्तम यश मिळवले असो तर कुणी एखादी वाखाजण्याजोगी कामगिरी केली असेल तर जयंत पाटील यांच्या फेसबुक पेजवरून त्यांचे अभिनंदन पर पोस्ट करतात. श्रेयाच्या सुंदर हस्ताक्षराचे पोस्ट देखील जयंत पाटील यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळेच आपल्या हस्ताक्षराच्या जादूमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या श्रेया गोरक्षनाथ सजन या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे.

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणतात, 'प्रिय श्रेया, तुझे सर्वात आधी खूप खूप अभिनंदन! आज मी तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खूप कौतुक वाटले. आजच्या धावपळीच्या जगात हाताने लिहिणे हे दुर्मिळ होत चालले आहे. अशावेळी सुंदर अक्षर असणे तर फार दुरचे झाले आहे. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या खुप खुप शुभेच्छा!'

पटकावला पहिला नंबर

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने हस्ताक्षर स्पर्धेत मुलींमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. तिचे सुंदर हस्ताक्षर बघितले तर तुम्हीही थक्क व्हाल. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सात्रळ गावची जिल्हा परिषदेची शाळा. शाळा जशी भारी दिसतेय तशीच इथली मुलं देखील एकापेक्षा एक भारी आहेत. या शाळेत तिसरीत शिकणारी श्रेया सजन या मुलीचा हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा नंबर आला आहे. तर मुलींमध्ये ती जिल्ह्यात पहिली आली आहे.

शेरास सव्वाशेर ही कथा तिने कागदावर उतरवली आणि ती खरंच सव्वाशेर ठरली. तिचे वडील गोरक्षनाथ सजन याच शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी मुलीतील कलागुण ती पहिलीला असतानाच ओळखले आणि तिचे हस्ताक्षर सुधारवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बघता बघता तिने शाळेत, केंद्रात, तालुक्यात आणि आता जिल्ह्यातही पहिला क्रमांक पटकावला आहे. याचा तिचे वडिल गोरक्षनाथ सजन (शिक्षक) अभिमान वाटत आहे. मुलीच्या यशाने तिची आई मनिषाला तर आकाश ठेंगणं झालं आहे. सोशल मीडियावर मुलीच्या झालेल्या कौतुकानेच तिची आई खूप आनंदी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनीही आता कात टाकली. हसत खेळत शिक्षण मुलांना मिळत असल्याने मुलांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. श्रेयाला मिळालेल्या यशामुळे शिक्षकांनाही आता नवी उर्जा मिळाली आहे, असे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे. प्रार्थना असो, की लेझीम, मैदानी खेळ असो वा कविता अगदी मनापासून मुले यात सहभागी होत असल्याने जिल्हा परिषदेची शाळा मुलांना आपलीशी झाली. आपल्या माय मराठीला जगवण्याचं काम जिल्हा परिषदेचे हे शिक्षक करत आहेत.

First published: February 6, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या