Home /News /news /

15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर या खेळाडूने घेतली निवृत्ती

15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर या खेळाडूने घेतली निवृत्ती

श्रीलंकेचा अनुभवी ओपनिंग बॅट्समन उपुल थरंगा (Upul Tharanga) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये थरंगाने अगदी थोडा काळ श्रीलंकेचं (Sri Lanka Cricket) नेतृत्वही केलं.

पुढे वाचा ...
    कोलंबो, 24 फेब्रुवारी : श्रीलंकेचा अनुभवी ओपनिंग बॅट्समन उपुल थरंगा (Upul Tharanga) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये थरंगाने अगदी थोडा काळ श्रीलंकेचं (Sri Lanka Cricket) नेतृत्वही केलं. 36 वर्षांचा उपुल थरंगा 2017 साली जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये श्रीलंकेचा कर्णधार होता. त्याने श्रीलंकेसाठी शेवटची मॅच 2019 साली दक्षिण आफ्रिकेत खेळली. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतल्याचं थरंगाने ट्विट करून सांगितलं. त्याने श्रीलंकेसाठी 31 टेस्टमध्ये 21.89 च्या सरासरीने 1,754 रन केले, यात तीन शतकं आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. अहमदाबादमध्ये डिसेंबर 2005 साली थरंगा पहिली टेस्ट खेळला, तर त्याने शेवटची टेस्टही 2017 साली भारताविरुद्धच खेळली. डावखुरा ओपनर असलेला थरंगा वनडे क्रिकेटमध्ये जास्त यशस्वी ठरला. 235 वनडेमध्ये त्याने 33.74 च्या सरासरीने 6,951 रन केले. यामध्ये 15 शतकं आणि 37 अर्धशतकांचा समावेश होता. थरंगाने 26 टी-20 मॅचमध्ये 407 रन केले. 'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो. आता 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरला पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे. या प्रवासामध्ये चांगल्या आठवणी आणि मित्रही मिळाले. माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे श्रीलंका क्रिकेटचा मी आभारी आहे. क्रिकेटप्रेमी, प्रशंसक आणि मित्र तसंच कुटुंबाला धन्यवाद.' असं ट्विट थरंगाने केलं. श्रीलंकेतलं वृत्तपत्र असलेल्या द मॉर्निंगमध्ये थरंगासह 15 श्रीलंकेचे खेळाडू देश सोडून अमेरिकेत जाणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. हे सगळे खेळाडू मार्च महिन्यापर्यंत अमेरिकेत जातील, असं या वृत्तात सांगण्यात आलं होतं. हे क्रिकेटपटू देशाकडून योग्य संधी मिळत नसल्यामुळे आणि आर्थिकदृष्ट्याही योग्य समर्थन मिळत नसल्यामुळे निराश होते, त्यामुळे नवा पर्याय म्हणून हे 15 क्रिकेटपटू अमेरिकेत जाणार असल्याचंही या वृत्तात सांगण्यात आलं. थरंगाच्या निवृत्ती मागे देखील हेच कारण असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या