SPECIAL REPORT : बाळासाहेबांनी सेनेसाठी तेव्हा 'जो' बदल केला, तोच निर्णय राज ठाकरे घेतील का?

SPECIAL REPORT : बाळासाहेबांनी सेनेसाठी तेव्हा 'जो' बदल केला, तोच निर्णय राज ठाकरे घेतील का?

महाअधिवेशनाच्या निमित्तानं मनसेच्या जाहिरातीत त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 23 जानेवारी :  गेल्या काही वर्षात लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आला नाही. मात्र, आता  हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याची सुरुवात झेंड्यापासून केला जाणार असल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचं महाअधिवेशन आज होणार आहे. मात्र, या अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय चर्चा झडू लागल्यात. मनसे आपली दिशा आणि पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेनं काँग्रेस -राष्ट्रवादीशी आघाडी करुन राज्यात सत्तास्थापन केली. त्यामुळं आता सेनेनं हिंदुत्वाशी फारकत घेतल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. तसंच मनसेकडूनही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं जातं आहे. त्यामुळं आगामी काळात मनसेकडून हिंदुत्वाचा नार बुलंद केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाअधिवेशनाच्या निमित्तानं मनसेच्या जाहिरातीत त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय. या जाहिरातीत अवघा महाराष्ट्र भगव्या रंगात रंगवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेचं इंजिन हिंदुत्वाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर मनसेच्या झेंड्यात भगवा, हिरवा आणि निळा हे तीन रंग आहेत. पण आता मनसे झेंड्याचा रंगही बदलण्याच्या तयारीत आहे.

तसंच मनसे झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं चिन्ह वापरणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला राज्यातील काही शिवप्रेमी संघटनांनी विरोध केलाय. त्यामुळे मनसे आपला झेंडा बदलणार का? याचा खुलासा महाअधिवेशनातच होणार आहे. शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे मनसे आता सेनेची जागा घेऊ पाहत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात टीकेची झोड उठवली होती. तसंच राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओमुळं भाजपला बॅकफूटवर जावं लागलं होतं. त्यांच्या भाषणांचा  काही प्रमाणात दोन्ही काँग्रेसला फायदाही झाला.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरण बदललं. त्यामुळं आता  मनसे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन  भाजप सोबत जाणार का? याविषयी चर्चा सुरू झालीय.

खरंतर गेल्या सात-आठ वर्षांत मनसेला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. सतत पक्षाची पडझड होत गेली. राज्य पातळीवर पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होत गेलं. ठोस कार्यक्रम नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली. मात्र, आता महाअधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज ठाकरे यांची मनसे सेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा हात घेतला होता. मात्र, कालांतरानं सेनेनं हिंदुत्वचा मुद्दा हाती घेत राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली. राज ठाकरे यांनाही मराठीच्या मुद्द्या हाती घेत मनसेची स्थापना केली. आता सेने प्रमाणेच मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेनं धावणार का? हे लवकरचं स्पष्ट होईल.

First published: January 23, 2020, 6:46 AM IST

ताज्या बातम्या