SPECIAL REPORT : भाजप-मनसे युती झाल्यास...

SPECIAL REPORT : भाजप-मनसे युती झाल्यास...

राज्यात अनपेक्षितपणे अस्तित्वात आलेल्या महाविकासआघाडीतून महाराष्ट्र सावरतोय न सावरतोय तोच भाजप आणि मनसेच्या नव्या समीकरणाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी :  राजकारणात काहीही होवू शकतं हे दाखवून देण्याची जणू स्पर्धाच राजकीय पक्षांमध्ये लागलेली दिसतेय. काँग्रेस सोबत जावून शिवसेनेनं सगळ्यांनाच धक्का दिला. आता टोकाचे मोदी विरोधी राज ठाकरे भाजपच्या नेत्यांसोबत गुप्त खलबतं करू लागल्यानं नव्या समिकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांविरोधात आरोपांची राळ उठवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनात नेमकं कुठलं वादळ घोंघावतंय याची कल्पना अजून तरी कुणाला नाही. यातच राज्यात अनपेक्षितपणे अस्तित्वात आलेल्या महाविकासआघाडीतून महाराष्ट्र सावरतोय न सावरतोय तोच भाजप आणि मनसेच्या नव्या समीकरणाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुप्त भेटीनं त्याला अधीकच हवा मिळालेली असताना मुनगंटीवारांनी केलेलं हे वक्तव्यही बरंच बोलकं आहे.

हिंदुत्वानं बांधलेल्या भाजप शिवसेनेच्या युतीची गाठ मुख्यमंत्रिपदाच्या वादानं सुटली. सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा बाणा जपणे अवघड जाणार आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्याची नामी संधी साधण्यासाठी की काय मनसे अनेक रंगांचा झेडा सोडून भगवा हातात घेण्याच्या विचारात आहे.  त्यात भाजपसारखा हिंदुत्वावादी विचारधारेचा पक्ष मनसेला जवळचा वाटू शकतो. तसंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सख्य नवं नाही.

बहोत पुराना याराना है!

2014 च्या निवडणुकीत मनसेचा मोदींना पाठिंबा

मोदींच्या गुजरात मॉडेलचं राज ठाकरेंकडून कौतूक

370 कलम रद्द करण्याचा निर्णयाचं स्वागत केलं

बांगलादेशी घुसखोरांबद्दल राज ठाकरे आक्रमक

रझा अकादमीच्या हिंसक आंदोलनानंतर राज आक्रमक

सध्याच्या राजकारणात वैचारिक बैठक वगैरे शब्द कधीच निकालात निघालेत. सत्ता आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कुणी कुणासोबतही जायला तयार आहे. अशावेळी एकट्या पडलेल्या भाजपला आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मनसेला कुणाची तरी साथ हवी आहे. एकमेकांची गरज बनलेल्या भाजप आणि मनसेनं हातमिळवणी करणं शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतं.

भाजप-मनसे युती झाल्यास...

मुंबई महापालिका काबीज करणं शक्य

मनसेच्या साथीनं मराठी मतांची गोळाबेरीज करण्याचा भाजपचा प्रयत्न

भाजपची ताकद मिळाल्यास पराभूत मनसेला उभारीची आशा

प्रखर हिंदूत्वाचा बाणा सोडलेल्या सेनेच्या मतांमध्ये खिंडार पडू शकतं

त्यामुळे विरोधकही सावध आहेत. राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे वाक्य गुळगुळीत झालेल्या वाक्याची आपले राजकारणी पुन्हा पुन्हा आपल्याला प्रतिचीत देतात. मोदींवर अत्यंत कठोर शाब्दिक हल्ले चढवणारे राज ठाकरे भाजपसोबत गेल्यास तो राजकीय भूकंप ठरू शकतो. असा भूकंप झाल्यास विरोधकही म्हणू लागतील लाव रे तो व्हिडिओ..

Published by: sachin Salve
First published: January 8, 2020, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading