SPECIAL REPORT : चंद्रकांत पाटलांविरोधात 'पुणे पॅटर्न', ब्राह्मण संघटना ठरणार डोकेदुखी

विरोधकांनी मनसेच्या किशोर शिंदेंना पाठिंबा जाहीर करून पुन्हा एकदा एक नवाच पुणे पॅटर्न जन्माला घातला

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 11:05 PM IST

SPECIAL REPORT : चंद्रकांत पाटलांविरोधात 'पुणे पॅटर्न', ब्राह्मण संघटना ठरणार डोकेदुखी

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 04 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी पुणे पॅटर्नची परंपरा कायम ठेवली आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी मनसेच्या किशोर शिंदेंना उतरवलंय. तर दुसरीकडे ब्राह्मण संघटनेच्या 2 उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने कोथरुडच्या लढतीत वेगळेच रंग भरले आहे.

कोथरूडमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंना आपल्या बाजूला वळवून घेतल्याने तिथली लढत आता एकतर्फीच होणार असं वाटलं होतं. पण विरोधकांनी मनसेच्या किशोर शिंदेंना पाठिंबा जाहीर करून पुन्हा एकदा एक नवाच पुणे पॅटर्न जन्माला घातला. विशेष म्हणजे कोथरूड मतदारसंघात मनसेला काँग्रेस आघाडीने पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर झाल्याचं सांगायलाही आघाडीवाले विसरले नाहीत.

दुसरीकडे भाजपने मेधा कुलकर्णी यांना डावलल्याने ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्यात. विश्वजित देशपांडे आणि मयुरेश अरगडे असे एक सोडून 2 उमेदवार ब्राह्मण महासंघाने कोथरूडच्या मैदानात उतरवलेत.

पुणे पालिकेत सुरेश कलमाडी यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. आता विधानसभेतही भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूडची पाटीलकी मिळू नये, यासाठी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले एकत्र आलेत. या अनोख्या पुणे पॅटर्नच्या निमित्ताने कोथरूडमध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा झाल्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

Loading...

================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...