Elec-widget

#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर

#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर

धडधडत जाणारी ट्रेन बघून ही मुलंच का चालवतात? मुली का नाही चालवत? असा लहानपणी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीनेच देणाऱ्या अकोल्याच्या इंजिन ड्रायव्हर सपना जंघेला यांच्याशी बातचीत..

  • Share this:

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. सामान्यांमधल्या असामान्य स्त्रिया शोधून त्यांच्या जिद्दीचा, मेहनतीचा जागर करण्याच्या उद्देशानंच हा दुर्गोत्सव. 

 

राम देशपांडे

“झुकझुक आगीनगाडी, तिच्या धुरांच्या रेषा, लांबवरून येणाऱ्या शिट्टीचा आवाज, तिचं धडधडत येणं आणि न संपणारी लांबच्या लांब डब्यांची रांग... लहानपणापासूनच रेल्वेचं मला प्रचंड आकर्षण होतं. अक्षरशः या गाड्यांनी वेड लावलं होतं. छिंदवाड्याला राहत असताना घराजवळच रेल्वे ट्रॅक होता. गाडीचा आवाज कानावर पडताच मी गच्चीवर धावत जायचे आणि जोवर ती गाडी नजरेआड होत नाही तोवर तिला न्याहाळत बसायचे. मला ही गाडी चालवायला मिळेल का? असे आणि बरेच प्रश्न मनात उमटायचे.... “ अकोल्याच्या सपना जंघेला सांगत होत्या.

धडधडत जाणारी ट्रेन बघून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. ट्रेन मुलंच का चालवतात? मुली का नाही चालवत? बालपणच्या या प्रश्नांवर आज आपल्या ध्येयानेच उत्तर देणाऱ्या सपना जंघेला सांगतात, “दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद झोनमध्ये पहिली महिला लोको पायलट इंजिन ड्रायव्हर होण्याचा मान मला मिळालाय.''

Loading...

सपना दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर लोको पायलट इंजिन ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. 'स्वप्ना'तल्या जिद्दीला या युवतीनं प्रत्यक्षात उतरवलंय. सपनाचा जन्म मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा इथे झाला. दहावीपर्यंतचं शिक्षण छिंदवाड्यातच झालं. वडील रामगोपालसिंग जंघेला हे एएसएफ म्हणून रेल्वेमध्येच होते. सपनाला एक बहीण सोनम आणि एक भाऊ राजेश. कामाचा व्याप असला तरी रामगोपालसिंग यांचं मुलांकडे बारिक लक्ष असायचं. मुलांच्या मनात काय चाललंय ते लगेच कळायचं. रेल्वे गाड्या पाहून सपनाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं ते निरसन करायचे. बायकोचा विरोध झुगारून त्यांनी सपनाला पॉलिटेक्निक करायला मांडल्याला पाठवलं.

''बाबांनी माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं, आणि ते सुद्धा घरच्यांचा विरोध पत्करून. झालं, मीसुद्धा स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा चंग बांधला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण होताच मी RRBची एक्झॅम दिली, आणि पहिल्याच प्रयत्नात पासही झाले. सिकंदराबादच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेत मी प्रथम स्थान पटकावलं. लोको इंजिन पायलटच्या ट्रेनिंगसाठी माझी निवड झाली होती. ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या 450 मुलांमध्ये मी एकटी मुलगी होती. मुलंच नव्हे, तर मुलीसुद्धा ट्रेन चालवू शकतात हे सिद्ध करण्याची आता मी सज्ज झाले होते'',असं सपना सांगतात.

''प्रत्येक पालकांना मुलांची काळजी असते. त्यातल्या त्यात मुलगी असेल तर फारच. मुलीचं शिक्षण झालं की, घरच्यांना आधी तिच्या लग्नाचे वेध लागतात. आमच्याकडे काही वेगळी परिस्थिती नव्हती. सुरुवातीला माझ्या वेगळ्या क्षेत्रातल्या नोकरीला माझ्या आईनंच विरोध केला, पण माझ्या वडिलांनी मला कायम प्रोत्साहन दिलं. नंतर मात्र घरच्या सगळ्यांनी पाठिंबा दिला. ट्रेनिंगला असताना आई आवर्जून माझ्यासोबत रहायला आली होती."

"बऱ्याच मुलींना उंच भरारी घेण्याची इच्छा असते. मात्र, परिस्थिती आणि घरच्यांचा विरोधापुढं त्या काहीच करू शकत नाहीत. आयुष्यात काय व्हायचंय हे त्यांच्या मनात असतं, पण त्याबद्दल त्या बोलू शकत नाहीत. अशा वेळी मुलींनी खंबीरपणे त्यांच्या घरच्यांशी बोलायला हवं, आपलं ध्येय घरच्यांना पटवून द्यायला हवं'', असं सपना सांगतात.

रेल्वे इंजिन ड्रायव्हरच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या 450 उमेदवारांपैकी एकमेव ठरल्याने आणि प्रशिक्षणादरम्यान सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2006 मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सपनाला जनरल मॅनेजर हा किताब देऊन गौरव केला. ''ट्रेनिंगदरम्यान मी एकटी मुलगी असल्याचं मला कधी जाणवलं नाही. प्रत्येक अधिकारी आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझा कायम उत्साह वाढवला'', असं त्या सांगतात.

ट्रेनिंग संपताच द. मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात पूर्णा आणि परभणी इथे लोको इंजिन पायलट म्हणून सपना यांच्याकडे इंजिंनचं शंटिंग करण्याची जबाबदारी देण्यात आली. 2008 मध्ये द. मध्यच्या अकोला रेल्वे स्थानकावर सपना लोको इंजिन पायलट म्हणून रूजू झाल्या. 2010 मध्ये सपनाकडे शंटिंगची जबाबदारी देण्यात आली. 2014 मध्ये सपनाकडे गुड्स लोको पायलय म्हणून जबाबदारी आली. 2014 मध्ये चिफ ग्रुप कंट्रोलर म्हणून त्यांची बढती झाली. तर 2017 मध्ये सपनाने सर्वप्रथम पॅसेंजर ट्रेन चालवली. ''गुड्स लोको पायलट म्हणून काम करतांना दिवस असो वा रात्र गाडी कुठे आणि केव्हा थांबवावी लागेल याचा नेम नसतो. त्यामुळे कितीही म्हटलं तरी भीती वाटायची. निर्जन स्थळी रात्रीची मालगाडी आणि ती चालवणारी मी एकटीच... पण तरीही काम करताना समाधान वाटायचं'', असे अनुभव सपना सांगतात.

2008 मध्ये सपना यांना डीआरएम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2013 मध्ये कॉम अवार्ड अर्थात चिफ ऑपरेशन मॅनेजर हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये परत एकदा डीआरएम पुरस्काराने स्नमानित करण्यात आलं. 2017 मध्ये सपना हैदराबाद-गुंटकल येथे पॅसेंजर ड्रायव्हरच्या ट्रेनिंगसाठी गेली होती. त्यानंतर द.मध्य रेल्वे मार्गावरील लाखो लोकांना सपना प्रवास घडवत आहेत. असा एकएक टप्पा पार करणारी सपना लवकरच लोकांना एक्सप्रेस चालवणार आहे.

''माझं अकोल्याचं जॉइनिंग आणि लग्न एकाच वर्षातलं. 2008 मध्ये रायपूरचे विजयसिंग सोनकर यांच्याशी माझा विवाह झाला. ते अकोल्याजवळच्या पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात असिस्टंट इंजिनिअर आहेत. 2009 मध्ये मला मुलगा झाला. त्याचं नाव विश्वाससिंग. एप्रिल 2018 मध्ये मला एक गोड मुलगी झाली. तिचं नाव आम्ही शिवांगी ठेवलंय.... " सपना त्यांच्या रुटीनविषयीही सांगतात. "अजुनही मी घरून निघताना दोन्ही वेळचा स्वयंपाक करून निघते. विश्वास लहान होता तेव्हा अनेकदा मी त्याला घेऊन कामावर गेलीय. त्यावेळेस माझ्याकडे केवळ शंटिंगचं काम होतं. त्यामुळं सहकांऱ्याजवळ त्याला ठेऊन मी तेवढं काम करून परत यायचे. सध्या मी अकोला ते नांदेड पॅसेंजर चालवते. त्यामुळे जाऊन परतायला 24 तास लागतात. आणि आनंदाची बाब अशी की, लवकरच मी एक्सप्रेसदेखील चालवणार आहे. मला स्वयंपाकाची भारी आवड आहे, त्यामुळे मी अजुनही दोन्हीवेळचं जेवण तयार करून निघते. घरच्या कामासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी बाई ठेवली असली तरी आई आहे मी शेवटी. घार कितीही उंच उडत असली तरी, तीचं अर्ध लक्ष आपल्या पिलांकडेच असतं'', असं त्या हसून सांगतात.

इंजिनमध्ये चढताना मी नेहमी त्याला नमस्कार करूनच वर चढते, असं सपना श्रद्धेनं सांगतात. देवावर अपार श्रद्धा आहे आणि कामावरही आहे, असंही त्या सांगतात. सध्या नवरात्रीसाठी सपना यांचं घर सज्ज आहे. नवरात्रापूर्वी घर आवरायला काढलंय. घर आवरताना सापडलेले फोटो आणि त्यांच्या आठवणी सपना यांनी न्यूज18 लोकमतबरोबर शेअर केल्या. प्रत्यक्ष जीवनात एवढी सर्व आव्हाने स्वीकारणारी सपना दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस उपवास करतात. 'कुटुंबाप्रमाणेच प्रवाशांचीही मला तितकीच काळजी आहे, देवीने सर्वांना सुखरूप प्रवास घडविण्याची मला शक्ती द्यावी,' अशी मनोमन प्रार्थना करते... त्या सांगतात.

#Durgotsav2018 : ट्रेन चालवण्याची 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी सपना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...