News18 Lokmat

नव्वद वर्षाचा तरुण; आजही चालवतोय बैलजोडी आणि नांगर!

निसर्गाच्या आणि समाजातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोलापुरातले यादवराव तगारे कृतार्थपणे आपलं जीवन जगताहेत. विशेष म्हणजे वयाच्या नव्वदीतही त्यांनी आपल्या हातातला बैलजोडीचा दोर आणि नांगराची पकड सोडलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2018 09:29 PM IST

नव्वद वर्षाचा तरुण; आजही चालवतोय बैलजोडी आणि नांगर!

सागर सुरवसे, सोलापूर, 20 ऑक्टोबर : शेतीवर आलेली संकटं पचवू न शकल्यानं आजवर लाखो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. मात्र, मागील ७० वर्षांपासून निसर्गाच्या आणि समाजातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोलापुरातले एक आजोबा कृतार्थ पणे आपलं जीवन जगताहेत. विशेष म्हणजे वयाच्या नव्वदीतही त्यांनी आपल्या हातातला बैलजोडीचा दोर आणि नांगराची पकड सोडलेली नाही.

सोलापूर तालुक्यातील रानमसला गावात राहणाऱ्या या आजोबांचं नाव आहे यादवराव तगारे. हे आजोबा आहेत ९० वर्षांचे, पण आजच्या तरुण शेतकऱ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीनं ते खांद्यावर कुळव घेऊन फिरतात. पहाटे चार वाजता उठणं, थंड पाण्यानं अंघोळ करणं, मिळेल तो भाकर तुकडा खाणं आणि दिवस उगवला की आपल्या ढवळ्या-पवळ्यासह काळ्या आईच्या सेवेत स्वतःला जुंपून घेणं हाच रानमसले गावच्या यादवराव तगारेंचा दिनक्रम. वयाची ऐशी-नव्वदी पार केलेली शेतकरी मंडळी पाहायला मिळणं आणि त्यांच्याकडील अनुभव जाणून घेणं हे आज तसं दुर्मिळच झालंय. दिवस असो वा रात्र, आजही तगरे आजोबा तरूण पिढीला लाजवेल असं काम करतायत.

यादवराव तगारे आजोबांनी तरुणपणात 18 वर्ष सालगडी म्हणून काम केलं. बैलकाम शिकले आणि बैलजोडी घेतली. हळूहळू घरची दीड एकर शेती कसली. जोडीला गावातल्या शेतकऱ्यांना नांगरणी, पेरणी, बैल मशागतीची कामं करुन द्यायला सुरुवात केली. गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते नित्यनियमानं हे काम करतायत.

आज तरुण पिढी शेतीकामाला ट्रॅक्टर वापरण्यास प्राधान्य देतेय. मात्र या आधुनिकतेच्या जमान्यात तगारेंनी आपली खिल्लार बैलांची जोडी सांभाळलीय. लोकांची शेती नांगरणं, वखरुन आणि पेरणी करुन देणं नित्यानं सुरु आहे. यंदा परतीचा मान्सून न बरसल्यानं शेतकऱ्यांनी शिल्लक ओलीतावर रब्बीच्या पेरण्या उरकण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी लावलाय. त्यामुळं तगारे आजोबांची मशागत आणि पेरणीसाठी मागणी वाढलीय. यामुळे शेतकऱ्यांच्या सेवेत तगारे आजोबा चक्क रात्रीसुद्धा मशागतीचं काम उरकतायत. तर दिवसा पेरणीचं काम करतायत.

स्वाभिमानी वृत्ती आणि कणखरतेच्या बळावर तगारे आजोबा आपल्या रोजीरोटीचा प्रश्न स्वतः मिटवतायत. त्यांना वयाच्या नव्वदीतही कोणापुढं हात पसरवायला आवडत नाही असं रानमसलाचे शेतकरी दयानंद कुंभार सांगतात.

Loading...

तगारे आजोबांनी आजपर्यंत सात ते आठ बैलजोड सांभाळल्यात. आज पाखऱ्या आणि सर्जा ही बैलजोडी त्यांची सोबत करतायत. हंगामात पेरणी-मशागतीची कामं करुन काही हजार रुपये जमवून त्यावर वर्षभराचा खर्च चालवण्याचं काम तगारे आजोबा नियमीतपणे करतायत. त्यांच्या या वयातल्या कामाकडं आणि काम करण्याच्या जिद्दीकडं पाहून तरुण शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळतेय अशी प्रतिक्रिया किशोर गरड यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

तगारे आजोबा केवळ नांगर एके नांगरच हाकत नाहीत, तर सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरांवरही परखडपणे भाष्य करतात. बाहत्तरच्या दुष्काळाबाबत आणि हरितक्रांतीच्या बदलांबाबतही ते आपले अनुभव सांगतात. आजच्या तरुणाईनं कष्टाला आवर घातला असून कष्ट न करण्याची आणि शॉर्ट कटमधून नफा कमावण्याची वृत्ती बळावल्याचं तगारे आजोबां सांगतात.

जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठासून भरलेला स्वाभिमान हेच तगारे आजोबांचं बलस्थान आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही ते सकारात्मकतेनं काळ्या आईच्या सेवेत दंग आहेत. आजचे शेतकरी दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी या संकटांना घाबरुन आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण तगारे आजोबांनी ही संकटं सकारात्मकतेनं झेललीत. आयुष्याच्या शेवटाकडं वाटचाल करणाऱ्या या तगारे आजोबांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला न्यूज18 लोकमतचा सलाम!

 भाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...