बीड, 21 एप्रिल : गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी बीड येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही म्हणून संतप्त जमावाने रुग्णवाहिकाच पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे घडली.
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला पुढील तपासणीसाठी बीड इथं जाण्याचा सल्ला आष्टी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता.
हेही वाचा - पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी, 'या' वेळेतच सुरू राहणार पेट्रोल पंप
रुग्णालयाच्या बाहेर असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली. मात्र, रुग्णवाहिकेच्या चालकाने, 'तुम्ही आधी 108 नंबर ला फोन लावून त्यांना कल्पना द्या', असं सांगितले. परंतु, यामुळे झालेल्या वादानंतर रुग्णवाहिका चालकाच्या बोलण्याचा राग मनात धरून महिलेच्या नातेवाईकांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या रुग्णवाहिकेलाच पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या समोरील भागात आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयातील कर्मचारी वेळीच धावून आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा - कोरोना योद्धा! रुग्णांसाठी टॅक्सी चालकाने लावली जीवाची बाजी, केली अशी मदत
या घटनेची माहिती आष्टी पोलीस ठाण्यात कळतात, आष्टी पोलीस ठाण्याचे पीआय माधव सूर्यवंशी यांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
ही रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed