रत्नागिरी, 12 फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मीर्ले- हुंबरवाडी या ठिकाणी एका धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे शेतात गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे अचानक लागलेल्या आगीत 3 म्हशींचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 2 जनावरे होरपळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा गोठादेखील जळून खाक झाला आहे. आग आज सायंकाळी 3 च्या सुमारास लागल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मीर्ले- हुंबरवाडी येथील विजय भोसले, विश्वनाथ भोसले आणि विशाल भोसले यांच्या मालकीचा गुरांचा गोठा घरापासून काही अंतरावर शेतात आहे. आज दुपारी वणव्यामुळे अचानक या गोठ्याला आग लागली आणि गोठ्यात बांधून ठेवलेल्या 3 म्हशींचा होरपळून मृत्यू झाला. म्हशींना गोठ्यात बांधून ठेवल्याने त्यांना आग लागली तरी पळताही आलं नाही. तेथेच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये 2 म्हशी आणि रेडकू होते. तर त्यांच्याच गोठ्यातील 1 गाय आणि एक म्हैस होरपळल्याने गंभीर जखमी आहेत.
हे ही वाचा-अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यावरुन नवा वाद; वंशजांकडून शरद पवारांचा कडाडून विरोध
घरापासून आणि वस्तीपासून खूप लांब अंतरावर हा गोठा असल्याने ही घटना कोणाच्याही तत्काळ निदर्शनास आली नाही. मात्र जंगलात फाट्या तोडण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थांच्या हे लक्षात आलं आणि त्याने तत्काळ गोठ्याच्या मालकाला जाऊन ही परिस्थिती सांगितली. मालक मदत करण्यासाठी पोहोचेपर्यंत गोठा आणि गोठ्यात बांधलेली जनावरे मरून गेली होती. तर जे जखमी होते त्यांना तातडीने तेथून हलवण्यात आलं व त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.