शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर सस्पेंस, पुन्हा बदलली राज्यपालांच्या भेटीची वेळ

शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर सस्पेंस, पुन्हा बदलली राज्यपालांच्या भेटीची वेळ

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडून शिवसेनेला 5 वाजताची वेळ देण्यात आली होती पण ती बदलून आता शिवसेना संध्याकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सगळ्यात आता शिवसेनेच्या गोटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडून शिवसेनेला 5 वाजताची वेळ देण्यात आली होती पण ती बदलून आता शिवसेना संध्याकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 40 मिनिटे बैठक झाली. याबैठकीनंतर अद्याप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर अखेरचा निर्णय न आल्यामुळे ही वेळ पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सत्ता वाटप आणि पद वाटपावर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेला पाठिंबा देण्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यावर चर्चा सुरू असल्याने शिवसेनेनं वेळ पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेवर अद्याप निर्णय न झाल्यामुळे शिवसेनेकडून दुसऱ्यांदा वेळ पुढे ढकलण्यात आली आहे.

सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले होते.

इतर बातम्या - साताऱ्यामध्ये सापडले तब्बल 13 गावठी बॉम्ब, महाराष्ट्रात खळबळ

ठाकरे-पवार युती? महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं पर्व

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार-ठाकरे संघर्षाची मोठी चर्चा झाली आहे. मात्र आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हे दोन्ही राजकीय घराणी एकत्र येण्याच्या स्थितीत आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांवर जहरी टीका करायचे. पण त्याचवेळी दोघांनीही मैत्रीचं नातं कधी तोडलं नाही. असं असलं तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष मात्र कायम राहिला. आता मात्र या संघर्षाचं रूपांतर युतीत होणार असल्याचं दिसत आहे.

शिवसेना NDA तून बाहेर पडणार?

भाजप-शिवसेनेत मोठा संघर्ष झाल्यानंतर शिवसेनेनं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राजीनामा देण्याआधी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती होती.

शिवसेना आज दिल्लीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. फक्त केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा नाही तर थेट एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता आणखीन वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं.

राज्यात महायुतीने एकत्र निवडणुका लढवल्या पण निकालानंतर भाजप-सेनेमध्ये बिनसलं. शिवसेना मुख्यमत्रिपदावर ठाम राहिली तर भाजपने असं काही ठरलंच नाही म्हटलं. अखेर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावाही करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 11, 2019, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading