पंजाब, 06 एप्रिल: पंजाबच्या गुरदासरपूरमध्ये गुरुवारी रात्री खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या बस अड्ड्यावर 3 अज्ञातांनी गोळ्या झाडत शिवसेना नेत्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेत्याच्या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
3 अज्ञात दुचाकीस्वारांनी येत शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक स्वर्णदीप सिंह आणि अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना नेत्याची अशा पद्धतीने हत्या झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अजय कुमार असं या शिवसेना नेत्याचं नाव आहे.
गुरुवारी रात्री शिवसेनेचे जिल्हा प्रधान वरिंद्र मुन्ना यांच्यासोबत ते जुन्या शाळा बस अड्ड्यावर बसले होते. यावेळी अचानक 3 बाईकस्वार आले आणि त्यांनी अजय कुमार यांच्यावर गोळीबार केला. गंभीर अवस्थेत असलेल्या अजय कुमार यांना तात्काळ रुग्णालायत नेण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे, अजय कुमार यांची हत्या होण्याच्या काही दिवसांपासून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. यावेळी अजय कुमार यांना सुरक्षा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.
घटनेचा तपास करताना सुरुवातीला पंजाब पोलिसांनी व्यक्तीक वादातून हत्या झाली असल्याचा अंदाज लावला आणि या हत्येमागे खालिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याच्या शक्यता नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता पोलीस प्रत्येक बाजूने प्रकरणाचा आणि आरोपीचा कसून शोध घेत आहे.
VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा 'गलती से मिस्टेक'; पाहा काय म्हणाले..