Home /News /news /

'टायगर अभी जिंदा है' म्हणत सेनेच्या मंत्र्याने दिले खोतकरांच्या आमदारकीचे संकेत

'टायगर अभी जिंदा है' म्हणत सेनेच्या मंत्र्याने दिले खोतकरांच्या आमदारकीचे संकेत

अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, युती सरकार असल्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासाठी खोतकरांना माघार घ्यावी लागली होती.

जालना, 19 ऑक्टोबर : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी लवकरच महाविकास आघाडी सरकार हे राज्यपालांकडे पाठवणार आहे. पण, दुसरीकडे इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 'टायगर अभी जिंदा है' असं म्हणत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे संकेत दिले आहे. शिवसेना आणि भाजपच्या युती सरकारच्या काळात निवडणुकीची संधी हुकल्यामुळे जालन्याचे शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर बॅकफूटवर पडले होते. पण, आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा खोतकर यांना मंत्रिमंडळात येण्याची हालचाल सुरू झाली आहे. खुद्द शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांच्याबद्दल संकेत दिले आहे. 'टायगर अभी जिंदा है...! म्हणत खोतकरांना विधानपरिषदेवर घेणार असल्याचे संकेत सत्तार यांनी दिले आहे. अर्जुन खोतकरांसाठी खास शिर्डीहून हार आणला आहे. तो त्यांच्या गळ्यात टाकला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख लवकरच त्यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेतील. परंतु, अर्जुन खोतकर यांची जालन्यासाठीच नाहीतर महाराष्ट्रासाठी गरज आहे. पण, सध्या झाले असे की, जागा चार असून मागणारे जास्त आहे. मात्र, पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, असे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, युती सरकार असल्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासाठी खोतकरांना माघार घ्यावी लागली होती. राज्यपाल सदस्य आमदारकीसाठी सेनेकडे 4 जागा दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची 12 जागा रिक्त झाल्या आहेत. पण, या जागेवर कुणाला पाठवावे असा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला होता. त्यातच राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे या यादीला आणखी विलंब झाला होता. पण, आता महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्याचे निश्चित केले आहे. राज्यपालांबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने हीच संधी साधून यादी पाठवण्याचे ठरवले आहे. पुढील आठवड्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्य सरकार राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 4 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली, जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असे पत्र लिहिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी भाषेत पत्र लिहून राज्यपालांसह भाजपला कोंडीत पकडले आहे. त्यात; भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ही संधी दवडणार नाही, हे निश्चित आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या