उदयनराजेंविरोधात लढलेल्या नरेंद्र पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी भूमिका केली स्पष्ट

उदयनराजेंविरोधात लढलेल्या नरेंद्र पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी भूमिका केली स्पष्ट

दयनराजेंविरुद्ध लढलेले नरेंद्र पाटील या पोटनिवडणुकीत नक्की काय भूमिका घेतात, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती.

  • Share this:

सातारा, 2 ऑक्टोबर : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उदनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू आहे. पण त्याचवेळी यंदा शिवसेनेच्या तिकीटावर लढून उदयनराजेंविरुद्ध लढलेले नरेंद्र पाटील या पोटनिवडणुकीत नक्की काय भूमिका घेतात, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. नरेंद्र पाटील यांनी आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

'सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उदयनराजे यांनी तिथून आता पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते काय निर्णय घेतील तोच आमचा निर्णय असेल,' असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत नरेंद्र पाटील उदयनराजेंना पाठिंबा देणार हे स्पष्ट झालं आहे.

'नरेंद्र पाटलांना खासदार बनवण्याचं आमचं स्वप्न'

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माथाडी कामगारांच्या नवी मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माथाडी कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.

'नरेंद्र पाटील हे लढवय्या पित्याचे लढवय्ये पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांनी जर थोडा आधी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला असता तर आज ते इथे खासदार म्हणून बसले असते. लगेच साताऱ्याच्या जागेवरून कलगीतुरा असं नाही. पण यापुढेही नरेंद्र पाटील यांना खासदार करण्याचं आमचं स्वप्न आहे,' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

हेही वाचा- नाराज नाईक कुटुंब भाजपमध्ये राहणार की नाही? संदीप नाईक म्हणतात...

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगला होता. या निवडणुकीत उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांचा पराभव केला. तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटलांना खासदार बनवण्याचं स्वप्न असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.

साताऱ्यात होणार रणसंग्राम, लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या