विजय कमळे पाटील, प्रतिनिधी
जालना, 1 डिसेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जालन्यातील (Jalna) शिवसेनेचे मोठे नेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर रामनगर साखर कारखान्यात 100 कोटी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या या आरोपांनंतर आज थेट जालन्यात दाखल झाले. त्यांनी रामनगर साखर कारखान्याला भेट देत काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्यांच्या या गंभीर आरोपांवर आता खोतकरांनी प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे सोमय्या यांच्या आरोपांमागे भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हेच असल्याचा दावा खोतकरांनी केला आहे. त्यामुळे आता सुरुवात दानवेंनी केलीय तर शेवट मी करेन, असं खोतकर म्हणाले आहेत.
"सोमय्या हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निमंत्रणावरुन जालना दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन सूड घ्यायला सुरुवात केलीय. मी कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहे. शिशुपालाचे आता 100 गुन्हे भरले आहेत. सुरुवात त्यांनी केलीय आता शेवट मी करीन", असा रोखठोक इशारा खोतकरांनी रावसाहेब दानवे यांना दिला आहे.
हेही वाचा : किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता जालन्यातलाच राष्ट्रवादीचा मोठा नेता? वाचा नेमकं काय म्हणाले...
"रावसाहेब दानवेंनी सुरुवात केलीय. आता शेवट मात्र मी करेन. त्यासाठी कुठल्याही पातळीवर जायची माझी तयारी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांना टार्गेट करुन केंद्रीय पथकाचा गैरवापर केला जातोय. किरीट सोमय्या ईडीचे बॉस आहेत का? केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा टिकविण्यासाठी सोमय्या बेताल वक्तव्य करतात. मी साखर कारखाना सुरु करत असल्याने माझी बदनामी केली जात आहे", असं अर्जुन खोतकर म्हणाले.
हेही वाचा : वीज वापरता मग वीजबिल भरायला का नको? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा सवाल
"केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते जो खराब रस्ते करेल त्याला बुलडोजर खाली टाकेल. आता ती वेळ आली आहे. रस्त्याच्या कामात केलेला भ्रष्टाचार बाहेर काढणार", असादेखील इशारा खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना दिला. तसेच "माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. भोकरदन, जाफराबाद, राजूर अनेक विषय आहेत. मात्र मी कधी माझ्या लेटरपॅडवर कोणाची तक्रार केली नाही. मला तर भाजपच्या शीर्ष नेत्याने तक्रार मागितली होती. मात्र मी दिली नाही", असंदेखील ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.