््मुंबई, 14 जानेवारी : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेनं आता सिनेमा डिप्लोमसी सुरू केली आहे. आज ‘ठाकरे’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते सलमान खान आणि संजय दत्तही उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी सामना किंवा शिवसेनेने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली नाही.
भाजपच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. युतीचा निर्णय मुंबईत होईल असंही ते म्हणाले होते.
दोन्ही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून जोमाने कामाला सुरूवातही केलीय. त्याचंही गणित युतीवर अवलंबून असल्याने युती झाली तर आघाडीलाही आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत. आता ठाकरे सिनेमाच्या निमित्तानं भाजप-शिवसेनेची सिनेमा डिप्लोमसी सुरू झाल्याने युती होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.