सातारा, 09 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी दौरा करत आहे. आज शरद पवार हे साताऱ्यातील कराडमध्ये पोहोचले. पण, यावेळी बैठकीला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजरीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे खासदार उदयनराजेंनीही बैठकीकडे पाठ फिरवली.
पृथ्वीराज चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या कराडमध्ये शरद पवार आज दाखल झाले. शरद पवारांच्या उपस्थितीत कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई , कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री (शहर ) सतेज पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील हे उपस्थित आहेत.
पण, या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण गैरहजर होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही, असं सांगण्यात आले आहे. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळेच चव्हाण या बैठकीला हजर नाही, अशी चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सुद्धा या बैठकीला गैरहजर आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हापासून उदयनराजे भोसले हे पवारांपासून दूर अंतर ठेवून आले.
विशेष म्हणजे, आमदार शिवेंद्रराजे भोसले या बैठकीला उपस्थितीत होते. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवेंद्रराजेंच्या बैठकीला उपस्थितीत राहिल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहे. तर उदयनराजे हे साताऱ्यातच असल्याची माहिती मिळाली आहे.