राहुल गांधींच्या सावरकर विधानावरून शिवसेना भडकली, राऊत म्हणाले...

राहुल गांधींच्या सावरकर विधानावरून शिवसेना भडकली, राऊत म्हणाले...

संजय राऊत यांच्या या ट्वीटमुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर :  'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर पलटवार केला होता. परंतु, आता शिवसेनेनं राहुल गांधींच्या या विधानावरून आक्रमक भूमिका मांडली आहे. 'आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, अशा शब्दात सेनेनं राहुल गांधींना सल्लावजा टोला लगावला आहे. सेनेच्या या भूमिकेमुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून सावरकर यांच्याबद्दल आपली भूमिका मांडली आहे.  आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, अशा शब्दात थेट संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.

तसंच विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला, असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तसंच नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

'मी राहुल सावकर नाही'

काँग्रेसकडून रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत,  'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला होता.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या ट्वीटमुळे महाविकासआघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याआधाही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मतदानावरून काँग्रेसने शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. सेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर राज्यसभेत सभात्याग केला होता. त्यानंतर आता सावरकर यांच्या व्यक्तव्यवरून ठिणगी पडण्याची चिन्ह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या