Home /News /news /

'निवडणुकांचा घोडेबाजार करायचा आणि जनतेला ओझ्याचे गाढव करायचे', शिवसेनेचा भाजपला टोला

'निवडणुकांचा घोडेबाजार करायचा आणि जनतेला ओझ्याचे गाढव करायचे', शिवसेनेचा भाजपला टोला

भाजपने आपले उमेदवार जाहीर करून पक्षातील प्रस्थापितांना धक्काच दिला आहे. खडसे, पंकजा मुंडे, तावडे अशा जुन्या-जाणत्यांना डावलून ‘भाजपला मत देऊ नका,’ असे जाहीर सभांतून सांगणार्‍या गोपीचंद पडळकरसारख्यांना उमेदवारी दिली आहे

    मुंबई, 11 मे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होत असल्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. परंतु, 'जर बिनविरोध निवडणूक झाली नसती तर राज्याच्या कानाकोपर्‍यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसले नसते. यात जीवाचा धोका तर होताच, मात्र लोकांना काय तोंड द्यायचे हा प्रश्नसुद्धा होताच. लोकांनी कामधंदे सोडून कडीकुलूपात घरी बसायचे आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचे, असे घडणे योग्य नव्हते' अशी बाजू शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामनातून मांडली आहे. ‘कोरोना’ काळात या निवडणुका बिनविरोध होतील काय? यावर काँग्रेसच्या भूमिकेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण काँग्रेसने ‘दहावा’ उमेदवार दिल्याने निवडणुकीचे थंड पडलेले पडघम वाजवायला मदत झाली होती.  त्यामुळे विनाकारण उद्भवणारा वाद आधीच शांत झाला. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार आहेत. त्यांचे तीन उमेदवार प्रत्येकी 29 मतांच्या गणितानुसार सहज निवडून येतील, पण त्यांनी चार उमेदवार रिंगणात उतरवले. ”आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयासाठी लागणारा आकडा आहे,” असे या फाकड्यांनी जाहीर केले. आता हा आकडा ते कोठून व कसा लावणार ते त्यांनाच माहीत, पण निवडणुकांचा घोडेबाजार  करायचा व त्यासाठी जनतेला ओझ्याचे गाढव करायचे हे एकदा पक्के केल्यावर अशा सोयीच्या राजकारणास ‘दूरदृष्टी’ वगैरे ठरवून मोकळे व्हायचे इतकेच आपल्या हातात आहे' असं म्हणत आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. हेही वाचा - ऊर्जा मंत्रालयात शिरला कोरोना, कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने इमारत करणार बंद 'कोरोनासारख्या कठीण काळात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र बसून बिनविरोध कसे काय करता येईल हे सामोपचाराने ठरवावे, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, राजकारणात अनेकदा सामोपचाराचा दुसरा अर्थ, ‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही. माघारीचा सामोपचार समोरच्याने पाळावा’ असा घेतला जातो. सुदैवाने महाराष्ट्रात असा अटीतटीचा प्रसंग उद्भवला नाही.  पण सत्तेच्या राजकारणात राजकीय अटीतटीचे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावर सामोपचाराने मार्ग निघाला तर सगळे सुरळीत होते. राज्य कोरोना काळात अस्थिर होऊ नये हाच या निवडणुकीमागचा हेतू आहे. त्यामुळे ‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हीत हेच महत्त्वाचे होते' असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली. हेही वाचा - उद्धव ठाकरे आज भरणार विधान परिषदेचा अर्ज, निवडणूक आयोग लवकरच करेल मोठी घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी हा समंजसपणा दाखवला हे बरे झाले. कारण निवडणुका झाल्या असत्या तर आमदारांचे गाडी-भाडे, भत्ते, इतर प्रशासकीय खर्च वाढला असता. आता हा ‘खर्च’ पंतप्रधान केअर फंडास देऊन राष्ट्रकार्यास हातभार लावता येईल. भाजपने आपले उमेदवार जाहीर करून पक्षातील प्रस्थापितांना धक्काच दिला आहे. खडसे, पंकजा मुंडे, तावडे अशा जुन्या-जाणत्यांना डावलून ‘भाजपला मत देऊ नका,’ असे जाहीर सभांतून सांगणार्‍या गोपीचंद पडळकरसारख्यांना उमेदवारी दिली आहे. (हे आम्ही सांगत नसून खडसे वगैरे मंडळी सांगत आहेत.) बाकी रणजितसिंह मोहिते पाटील बाहेरचेच व इतर दोघे भाजपचे असे गणित केले तरी पक्षांतर्गत धुसफूस समोर आलीच आहे, पण तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला टोला लगावला. 'सचिन सावंतांना उमेदवारी द्यायला हवी होती' राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवार केले. काँग्रेसकडून सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्‍याला संधी मिळेल असे वाटत होते. विदर्भाचे अतुल लोंढे यांचेही नाव चर्चेत होते, पण कोणास फारसे माहीत नसलेले राजेश राठोड व पापा मोदी ही मराठवाड्यातील नावे समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या ‘पेल्यात’ थोडा खळखळाट झाला. मात्र आता काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामोपचाराच्या राजकारणावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही सेनेनं व्यक्त केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Samana, Shivsena

    पुढील बातम्या