शिवसेना खासदार संजय जाधवांनी अखेर सोडलं मौन, राष्ट्रवादीविरुद्ध कसली कंबर

शिवसेना खासदार संजय जाधवांनी अखेर सोडलं मौन, राष्ट्रवादीविरुद्ध कसली कंबर

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द करण्यासाठी मराठवाडाभर आंदोलन करणार असल्याचा निर्धार खासदार संजय जाधव यांनी बोलून दाखवला आहे.

  • Share this:

परभणी, 31 ऑगस्ट: थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा देणारे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अखेर मौन सोडलं आहे. मी शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेतच राहणार असं सांगून खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. उद्यापासून (1 सप्टेंबर) खासदार संजय जाधव मराठवाडा भर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील खासदार संजय जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा... सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत, प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका

परभणीतील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि 70-30 हे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द करण्यासाठी मराठवाडाभर आंदोलन करणार असल्याचा निर्धार खासदार संजय जाधव यांनी बोलून दाखवला आहे.

खासदार जाधव यांनी राष्ट्रवादीसह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. शिवाय मी शिवसेनेतच आहे शिवसेनेतच राहणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी मला लोकांसाठी लढा उभारावा लागेल. जिल्ह्याचे प्रश्न सुटत नसतील तर रस्त्यावर उतरावेच लागेल, असा इशारा खासदार जाधव यांनी दिला आहे. उद्यापासून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70-30 च्या आरक्षणा विरोधात लढा उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे.

बाजार समित्या असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच ठिकाणी सर्वांना समान वाटा मिळायला हवा. मात्र असं काही होत नाही. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या गंगाखेड येथील विधानसभा प्रमुखांना फूस लावली आणि रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनासोबत घेऊन गंगाखेडमधील बाजार समितीत ही आपलं प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला. आपणही बाब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी यात मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी सर्वांनासोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येतील, असं काही करू नये असं आवाहन ही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा...कोट्यवधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा दणका

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारला मंजूर करून घेतले. मात्र आता त्यात काहीही होत नसल्याने जनभावना लक्षात घेऊन मी पक्षाचा खासदार असलो तरी मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन उभारावा लागत आहे, असं खासदार जाधव यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यातील सर्व खासदार आमदारांनी येत्या अधिवेशनात हा विषय मांडून उद्या सर्वच जिल्ह्यात हे आंदोलन करावे, असं आवाहन खासदार जाधव यांनी केलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या