नवी दिल्ली,5 फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वटहुकूम आणून अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असता तर आम्ही मोदी आणि पर्यायाने भाजप सरकारचे स्वागत केलं असतं. मात्र, राम मंदिर बांधण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सुकर झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाची पूजाच केली पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधण्यासाठी राम मंदिर तीर्थक्षेत्र नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. यावर प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एक बोलकी प्रतिक्रिया दिली.राम मंदिर उभारले जाणार आहे. हे सरकारचे श्रेय नाही. कारण सर्वोच्च न्यायालयामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 7 मार्च रोजी अयोध्या भेटीवर पोहोचत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ देखील जाणार आहे. या पूर्वी दोन वेळा उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामलल्ला मंदिराचे दर्शन घेतले होते. 'पहिले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर गुरुवारी शिवसेनेतर्फे लोकसभा खासदार अरविंद सावंत बोलणार आहेत. या वेळी ते अनेक मुद्यावर सरकार विरोधात बोलणार आहेत असे कळते. मोदी यांच्या घोषणेनंतर शिवसेना खासदारांची एक बैठक शिवसेनेच्या संसदीय कार्यालयात झाली. यात संबंधित निर्णयावर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रासाठी केंद्राचा मोठा निर्णय
दरम्यान, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पुढच्या पाच वर्षात 100 लाख कोटींचं उद्दीष्ट ठेवलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारचं हे सर्वात मोठं पाऊल आहे. या 100 लाख कोटींमध्ये देशात मोठे पायाभूत प्रकल्प उभे राहणार आहेत. या प्रकल्पांमधूनच ठाणे जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये मोठं बंदल उभारण्यात येणार असून त्यावर तब्बल 51 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. ते म्हणाले, डहाणूजवळ वाढवण हे नैसर्गिक बंदर आहे. त्याच ठिकाणी 51 हजार कोटी रुपये खर्च करून हे अत्याधुनिक बंदर उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ही मोठी गुंतवणूक ठरणार असून हजारो लोकांना त्यातून रोजगार मिळणार आहे. सागरी व्यापाराच्या दृष्टीने मुंबई हे देशातलं महत्त्वाचं बंदर आहे. त्याच्या जवळच हे मोठं बंदर उभं राहणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.
उत्पादनात होतेय वाढ
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचं चित्र पाहिलं तर आर्थिक मंदी (Indian Economy) दूर होण्याचे संकेत मिळतायत. रॉयटर्स या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार नव्या ऑर्डर मिळाल्यामुळे भारतातल्या उत्पादनात (Indian Manufacturing Activity) वेगाने वाढ होते आहे. ही उत्पादनातली वाढ गेल्या 8 वर्षांतली सर्वाधिक वाढ आहे.
निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (Nikkei PMI)नुसार डिसेंबरमधल्या 52.7 च्या तुलनेत मार्केट 55.3 वर पोहोचलं आहे. फेब्रुवारी 2012 नंतरची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, बाजारपेठेत मागणीमध्ये सुधारणा झाल्याचं चित्र दिसतं आहे. सोमवारी जारी झालेल्या मासिक सर्वेक्षणानुसार जानेवारीमध्ये देशातल्या उत्पादनाबद्दलच्या घडामोडी 8 वर्षांत सगळ्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. यामध्ये उत्पादन आणि रोजगाराबदद्ल प्रगती झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latest news, Pm modi, Sanjay raut, Sanjay Raut (Politician), Supreme court