उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजप नेत्यांकडून जशासतसे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजप नेत्यांकडून जशासतसे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते शिवसेनेला जशासतसे प्रत्युत्तर करू लागलेत. शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही स्वबळाची भाषा केलीय.

  • Share this:

23 जानेवारी, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते शिवसेनेला जशासतसे प्रत्युत्तर करू लागलेत. शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही स्वबळाची भाषा केलीय. आशिष शेलार म्हणाले. ''खरंतर आमची युतीचीच भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर 2019 च्या लोकसभा, विधानसभांसाठी भाजप ही तयार आहे. महाराष्ट्रातील जनताही तयार आहे. नुकसान त्यांचेच होईल.''

 

मुंबईचे आशिष शेलार कमी काय म्हणून तिकडे पुण्यातूनही भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही पुन्हा आकड्यांचा खेळ मांडून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेवर शरसंधान साधलंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ 5 तर भाजपचे 28 खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे.

काकडे म्हणाले, ''उद्धव ठाकरेंनी आज निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे सेनेची वाढ होणार नसून नुकसानच होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपच राहिल. मोदींच्या करिषम्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपचे 28 आणि शिवसेनेचे 5 खासदार निवडून येतील. शिवाय विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचे 165 आमदार निवडून येतील''

उद्धव ठाकरे काय म्हणालेत ?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सर्व राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं त्यांनी नमूद केलं.

First published: January 23, 2018, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading