Home /News /news /

राफेलचा वाद, शरद पवारांचं वक्तव्य : 'न्यूज18 लोकमत'च्या मुलाखतीने राजकीय क्षेत्रात खळबळ

राफेलचा वाद, शरद पवारांचं वक्तव्य : 'न्यूज18 लोकमत'च्या मुलाखतीने राजकीय क्षेत्रात खळबळ

दिल्लीत पवारांचं वजन असलं तरी विश्वासनियता नाही अशीही टीका होत असते. पवारांनी मोदींवर विश्वास दाखवला पण त्यांच्या विश्वसनियतेचं काय हा प्रश्न आता विचारला जातोय.

मुंबई, ता.28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळीचा आणि वक्तव्याचा अर्थ भल्या भल्यांना लागत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नेमकं कधी, कुठे, कसं आणि किती बोलायचं याचं भान पवारांकडे इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा जास्त आहे. पवारांच्या या कौशल्याचा अनुभव पुन्हा एकदा सर्वांना आलाय. राफेलच्या मुद्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी थेट अंगावर घेतलंय. पंतप्रधान मोदी हे चौकीदार नाहीत तर चोर आहेत. चोरच नाहीत तर ते चोरांचे सरदार आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. ही तर फक्त सुरूवात आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिला होता. असं वातावरण असताना पवारांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसच्या विरोधाला पवारांनी टाचणी लावली आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शरद पवार यांनी बुधवारी 26 सप्टेंबरला न्यूज18 लोकमला दिलेल्या मुलाखतीत लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींच्या हेतू बद्दल शंका नाही असं वक्तव्य केलं आणि देशभर राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण झालं. या मुलाखतीची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. देशभर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांच्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण एवढं वातावरण तापलं असताना शरद पवारांनी मात्र त्याबद्दल मौनच पाळणं पसंत केलं. शरद पवारांच्या या मौनातच अनेक अर्थ दडले आहेत. काँग्रेसच्या विरोधाची धार बोथट राफेलच्या मुद्यावरून काँग्रेस सध्या प्रचंड आक्रमक आहेत. राहुल गांधींनी थेट मोदींनाच लक्ष्य केलंय. स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात जमेची बाजू. मोदी हे चौकीदार नाही तर चोर आहेत, चोरांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका राहुल यांनी केली होती. मोदींच्या प्रतिमेवर प्रहार करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या विरोधाची धार बोथट झाल्याचं मानलं जातंय. राफेलच्या किंमती आणि जेपीसी चौकशीची मागणी पवारांनी केली असली तरी जनतेची नाडी ओळखणारा नेता म्हणून ओळख असलेल्या पवारांनी मोदी भ्रष्ट नाहीत, ते प्रामाणिक आहेत असं लोकांना वाटतं हे सांगणं ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळं काँग्रेसच्या आक्रमकपणाला विरोधीपक्षांचा पाहिजे तेवढा पाठिंबा मिळणार नाही याचाही हा संकेत मानला जातो. अमित शहांचे आभार पवारांच्या वक्तव्यावर देशभर चर्चा झडत असतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करून करून शरद पवारांचे आभार मानले आणि किमान पवारांसारख्या जेष्ठ नेत्यांच्या म्हणण्यावर तरी राहुल गांधींनी विश्वास ठेवावा असा सल्ला राहुल गांधींना दिला. पवारांच्या त्या वक्तव्याची दखल थेट अमित शहांनीच घेतल्याने राजकीय वर्तुळात त्याला वेगळं महत्व प्राप्त झालंय. अन्वर यांनी साधली अचूक वेळ राष्ट्रवादीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर हे गेली काही महिने पक्षात नाराज होते. महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांमध्ये राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव वाढत नसल्याने ते अस्वस्थ होते. त्यातच पवार आणि मोदी यांची केमेस्ट्रीही त्यांना फारशी पसंत नव्हती. राष्ट्रवादीत राहिलं तर भविष्यात फारसं हातात काही पडणार नाही हे ते ओळखून होते. त्यामुळे ही संधी साधत अन्वर यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. त्यांची घरवापसी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय. महाआघाडीत बिघाडी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला शरद पवार, सोनिया गांधी, मायावतीसह झाडून सगळे विरोधीपक्ष नेते हजर होते. भाजप विरोधात आता सगळे विरोधीपक्ष एकत्र येतील अशी हवा निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांमध्येच शरद पवार यांनी महाआघाडी होण्याची शक्यता नाही असं स्पष्ट केलं. निवडणुकीनंतर पुढच्या गोष्टी बघता येतील असंही पवार म्हणाले त्यामुळे भाजपविरोधात सर्व विरोधीपक्षांची मोट बांधण्याची राहुल गांधी यांची योजना पवारांच्या या भूमिकेमुळं बारगळणार हे स्पष्ट झालंय. राहुल यांचं नेतृत्व अमान्य शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असले तरी त्यांना राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही हे त्यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यानंतर ते पुन्हा एकदा स्पष्ट झालं. बहुमत मिळालं तर मी पंतप्रधान व्हायला तयार आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर पवारांनी लगेच आपली भूमिका स्पष्ट करत नेतृत्वाचा सध्या प्रश्नच नाही असं सांगितलं होतं. त्यामुळं सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळून राहुल गांधी यांचा पंतप्रधानपदावरचा दावा घट्ट होणार नाही याचीच काळजी पवार प्रत्येक वेळी घेत असतात. पवार आणि मोदी यांची केमेस्ट्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचं आणि मोदी यांचं सख्य आहे. पवारांचं बोट धरूनच मी राजकारणात पुढं जातोय असं मोदी म्हणाले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादीने लगेच भाजपला पाठिंबा दिला होता. मोदीही दोन वेळा बारामतीत जावून पवारांचा पाहुणचार घेऊन आले आहेत. त्यामुळं अशा अडचणीच्या वेळी पवारांनी मोदींना अप्रत्यक्ष मदत करणं याला राजकीय क्षेत्रात महत्व आहे. पवारांच्या विश्वसनियतेचं काय? शरद पवार हे आत्तापर्यंत न झालेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत अशी प्रतक्रिया उद्योगपती राहुल बजाज यांनी व्यक्त केली होती. पवारांचे भारतातल्या सर्वच पक्षांशी अत्यंत चांगले संबध आहेत. गेली 50 वर्ष पवार हे संसदीय राजकारणात आहे. प्रशासनावर घट्ट पकड आहे. प्रश्नांची उत्तम जाण आहे. जागतिक भान आहे. अनेक बड्या उद्योगपतींशीची त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. असं सर्व असतानाही पवारांच्या विश्वसनियतेबद्दल कायम शंका व्यक्त केली जाते. पवार जे बोलतात नेमकं त्याच्या विरूद्ध करतात अशी टीका होते. त्यामुळं दिल्लीत पवारांचं वजन असलं तरी विश्वासनियता नाही अशीही टीका होते. पवारांनी मोदींवर विश्वास दाखवला पण त्यांच्या विश्वसनियतेचं काय हा प्रश्न आता विचारला जातोय.   VIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे! असं कोण म्हणालं लतादीदींना?
First published:

Tags: Narendra modi, Rafale, Sharad pawar, Tariq anwar, तारिक अन्वर, नरेंद्र मोदी, राजकारण, राफेल, शरद पवार

पुढील बातम्या