12 डिसेंबर, नागपूर : राज्यातल्या सरकारशी बळीराजाने संपूर्ण असहकार पुकारावा, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांनी वीज बिलू भरू नयेत तसंच कर्जही फेडू नये, असं थेट आवाहनच शरद पवारांनी नागपूरच्या हल्लाबोल मोर्चात केलंय. शरद पवारांचा आज 77वा वाढदिवस आहे तरीही ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले. किंबहुना त्यांच्या नेतृत्वातच विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते गुलाब नबी आझाद सहभागी झाले होते.
शरद पवार म्हणाले, ''माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे आरोप करताना या भाजप सरकारला शरम वाटली पाहिजे. तुम्हाला सरकार चालवण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कुणालाही दमदाटी करून तुरूंगात टाकलं तर तुम्हाला उखडून टाकण्याची ताकद बळीराजामध्ये आहे. म्हणूनच आम्ही आज या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढलाय.''
गुलाब नबी आझाद म्हणाले, ''आम्हाला देश स्वतंत्र करण्याची घाई होती, भाजपला मात्र, सत्तेत येण्याचीच घाई आहे, माझा काश्मीर पेक्षा यवतमाळ आणि वाशीम सोबतच जास्त संबंध आहे, कारण मी इथूनच लोकसभेत गेलो होतो,'' याची आठवणही आझाद यांनी करून दिली.
प्रफूल पटेल म्हणाले, ''या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र पाहून देवेंद्र फडणवीसांची नक्कीच झोप उडाली असेल, गुजरातमधील परिवर्तनानंतर देशातही परिवर्तन पक्के आहे''
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आज नागपुरात या हल्लाबोल मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा