संदिप राजगोळकर, कोल्हापूर ,ता.18 जून : समतेची शिकवण देणारे राष्ट्रपुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या शाहू महाराजांनी राज्यालाच नाही तर देशाला सामाजिक समतेची दिशा दिली..येत्या 26 जूनला शाहू महाराजांची जयंती आहे पण कोल्हापूरमध्ये रयतेच्या राजाचं जन्मस्थळ आजही उपेक्षित आहे.
कोल्हापूर शहरातल्या कसबा बावडा परिसरातलं लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचं जन्मठिकाण आहे. इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ही वास्तू आज उपेक्षेच्या झळा सोसतेय. या वास्तूत भव्य असं संग्रहायलाय उभं करण्याचा निर्णय आजही पूर्ण झालेला नाही. सरकारी अनास्थेमुळं इथलं काम पुढं सरकलेलं नाही.
संग्रहालयासाठी आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या 4 निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. पुरातत्व विभागाकडे या वास्तूची मालकी असून त्यांच्या जाचक अटींमुळं निविदा स्विकारायला कुणी तयार नाही.
या वास्तूत 4 मुख्य इमारती तयार करण्यात आल्या आहेत.
राधानगरी धरणाची प्रतिकृती, खुलं ऑडिटोरियम, ग्रंथालय, कृत्रिम देखावे या सगळ्यांचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा आराखडा मंजूर झाला आहे. आता शाहू महाराजांचं जन्मस्थळ निविदांच्या प्रक्रियेत किती दिवस अडकून राहणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
हेही वाचा...