सर्बिया 30 जून : 'पनीर' आवडणार नाही असा माणूस दुर्मिळ आहे. जगभरच्या लोकांना 'पनीर'ने भुरळ पाडलीय. गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून 'पनीर' तयार करतात हे सगळ्यांना माहित आहे. पण गाढविणीच्या दुधापासूनही 'पनीर' बनवता येतं हे फारसं कुणालाच माहित नाही. मात्र सर्बियाच्या एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला आणि तो यशस्वीही ठरलाय. हे 'पनीर' जगातलं सर्वात महागडं पनीर असून त्याचा भाव ऐकला तर तुम्हीही चाट पडाल. या 'पनीर'चा एका किलोचा भाव आहे तब्बल 78 हजार रुपये किलो.
सर्बियाच्या स्लोबोदान सिमिक या शेतकऱ्याने आपल्या शेतात हा प्रयोग केला. त्याच्याकडे सध्या 200 पेक्षा जास्त गाढवं आहेत. त्या गाढवांची खास निगाही राखली जाते. या गाढवांना खास प्रकारचं खाद्य दिलं जातं आणि त्यांची काळजीही घेतली जाते. गाढविनीचं हे दुध आईच्या दुधासारखच असून ते बाळालाही दिलं जाऊ शकते असा दावा स्लोबोदान सिमिक यांनी केलाय. त्याचबरोबर विविध आजारांवरही त्याचा मोठा फायदा होता असा दावाही त्यांनी केला.
का आहे भाव जास्त?
एक गाय किंवा म्हैस एका वेळी 10 ते 15 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. मात्र गाढविन एका वेळी फक्त अर्धा किंवा त्यापेक्षा थोडं जास्त लिटर दुध देतं. त्यामुळं या पनीरचा भाव एवढा जास्त आहे. अस्थमा आणि इतर काही आजारांवर हे औषध प्रभावी ठरू शकतं असा त्यांचा दावा आहे. मात्र या पनीरचा शास्त्रीय अभ्यास अजून झालेला नाही. पहिल्यांदा 2012मध्ये याचा प्रयोग त्यांनी केला होता.
प्रसिद्ध टेनिसपटू नोवक डीजोकोविक याला या पनीरचा पुरवढा केला जातो अशी बातमी व्हायरल झाल्याने हे पनीर पहिल्यांदा चर्चत आलं होतं. मात्र नंतर त्याने याचा इन्कार केला होता. सिमिक हे या दुधापासून साबन आणि वाईनही तयार करतात. WHOने या दुधाचा अभ्यास करावा अशीही त्यांची मागणी आहे.