काश्मीरमध्ये लष्कराची धडक मोहीम, 18 महिन्यात 357 अतिरेक्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये लष्कराची धडक मोहीम, 18 महिन्यात 357 अतिरेक्यांचा खात्मा

गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 7 जून : जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे.

'ऑपरेशन ऑल आऊट'

'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे.

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.अमित शहांनीही ठरवलं टार्गेट

गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच जम्मू काश्मीरच्या टॉप 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज नायकू, लष्कर ए तोयबा चा जिल्हा कमांडर वसिम अहम्मद उर्फ ओसामा आणि हिज्बुलचा दहशतवादी अशरफ मौलवी यांची नावं आहेत.

सुरक्षा यंत्रणांशी सखोल चर्चा करून या दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. काश्मीरमधल्या वेगवेगळ्या भागात दहशतवादी कारवाया पसरवण्यामध्ये या दहशतवाद्यांचा हात आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचा बारामुल्ला जिल्ह्याचा कमांडर मेहराजुद्दीन आणि डॉक्टर सैफुल्लाह हेही गृहमंत्रालयाच्या निशाण्यावर आहेत.

झाकीर मुसा ठार

मोदी सरकार आल्या आल्याच झाकीर मुसा या हिज्बुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर झाकीर मुसा याची हिज्बुल मुजाहिद्दीनच्या काश्मीर विभागाचा म्होरक्या म्हणून नेमणूक झाली होती.

लष्कर गेले काही दिवस झाकीर मुसाच्या मागावर होतं. त्याला शोधण्यासाठी लष्कराने एक मोठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये अल कायदाचे तीन अतिरेकीही मारले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या