News18 Lokmat Impact : राहीबाईंना मिळणार नवं घर; चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

News18 Lokmat Impact : राहीबाईंना मिळणार नवं घर; चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

न्यूज18 लोकमतच्यावतीने पुण्यात राज्यातील 11 कृषी रत्नांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात 116 देशी वाणांचं जतन करणाऱ्या राहीबाईंनी आपलं घर आता लहान पडत असल्याची खंत व्यक्त केली.

  • Share this:

पुणे, 22 डिसेंबर : न्यूज18 लोकमतच्यावतीने पुण्यात राज्यातील 11 कृषी रत्नांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात 116 देशी वाणांचं जतन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेर यांचासुद्धा कृषी पुरस्कार देऊन गौरव करत आहे. या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलतांना त्यांनी देशी वाण ठेवावयास आपलं घर आता लहान पडत असल्याची खंत व्यक्त केली. त्यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना नवीन घर बांधून देण्याचं जाहीर केलं.

शेतामध्ये राबणाऱ्या राहीबाईंकडे पाहून तुम्ही त्यांना एक सामान्य स्त्री समजाल. पण राहीबाई या असामान्य व्यक्ती आहेत. कारण भल्या भल्यांना न जमलेली गोष्ट राहीबाई या आदिवासी शेतकरी महिलेनं केली आहे. तब्बल 54 पिकांचे 116 देशी वाण जमवून त्यांचं जतन राहीबाईंनी केलंय. केवळ जतन करुन त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी ते वाण वाढवण्यासाठीही जोमानं प्रयत्न केलेत. दुर्गम भागातली एक निरक्षर महिला असूनही त्यांनी हे काम लिलया केलं. गेल्या 2 दशकांपासून त्यांचा हा प्रवास अखंडपणे सुरु आहे.

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या कोंभळणे गावातल्या त्या अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्या बीजमाता म्हणूनही परिचित आहेत. या कामात त्यांना 'बाएफ' संस्थेचं मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. त्यांची गावरान बियाण्यांची बँक देखील प्रसिद्ध आहे. नुकताच त्यांचा जगभरातल्या 60 प्रभावशाली महिलांच्या यादीतही समावेश झाला. त्यावरून त्यांचं मोठेपण स्पष्ट होतं. येणाऱ्या काळात पृथ्वीचं तापमान दीड ते 2 अंश से. नं वाढण्याची शक्यता आहे. या काळात संकरित वाणांपेक्षा राहिबाईंसारख्या बीजमातांनी संवर्धित केलेली बियाणीच टिकाव धरणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी तर त्यांचा 'मदर ऑफ सीड' असा उल्लेख केलाय. न्यूज18 लोकमतच्यावतीने बियाणं संवर्धनासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राहीबाईंचा कृषी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 05:19 PM IST

ताज्या बातम्या