मुंबई, 06 सप्टेंबर : भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी बोललेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर अखेर 47 तासांनी माफी मागितली आहे. 'माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे' असं लिहित त्यांनी ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. तर राम कदम यांच्या ट्विटवर मनसेच्या संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राम कदमला माफ करायच की नाही हे महाराष्ट्र्यातल्या माता भगिनीच ठरवतील' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
दहिहंडी उत्सवातील वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यांच्या या विधानाबद्दल अनेक महिला आणि तरुणींनी संताप व्यक्त केला. राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
मात्र दोन दिवस राम कदम यांनी माफी मागितली नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राम कदम म्हणत होते. मात्र संपूर्ण राज्यभरातून संताप होत असल्यानं आज अखेर राम कदम यांनी ट्विट करुन महिलावर्गाची माफी मागितली. पण त्यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे,' असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राम कदम यांच्या विधानाबद्दल भाजपानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.
राम कदम यांनी केलेले ट्विट
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च
माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.@ANI
— Ram Kadam (@ramkadam) September 6, 2018
त्यावर संदीप देशपांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया
भले राम कदम यांनी माफी मागितली असेल पण त्याला माफ करायच की नाही हे महाराष्ट्र्यातल्या माता भगिनीच ठरवतील
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 6, 2018
संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भले राम कदम यांनी माफी मागितली असेल पण त्याला माफ करायच की नाही हे महाराष्ट्र्यातल्या माता भगिनीच ठरवतील.'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा