Home /News /news /

...तर तुमचे मुस्काट फोडले तर अन्याय कसा? मदन शर्मा प्रकरणावरून सेनेचा भाजपला टोला

...तर तुमचे मुस्काट फोडले तर अन्याय कसा? मदन शर्मा प्रकरणावरून सेनेचा भाजपला टोला

उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतही आतापर्यंत माजी सैनिकांवर कसे हल्ले झाले ते एकदा तपासून पाहाच.

    मुंबई, 14 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला सेनेनं आपल्या स्टाइलने धडा शिकवला. पण, भाजपने या प्रकरणावरून आंदोलन केले होते. भाजपच्या या भूमिकेवरून शिवसेनेनं सडकून टीका केली. या प्रकरणात ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल, अशी खिल्ली सेनेनं उडवली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राजकीय ‘ऑलिम्पिक’मध्ये पोरखेळ' शिर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या लेखातून सेनेने माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आणि भाजपवर एकच हल्लाबोल करण्यात आला आहे. 'चीनच्या सीमेवर 20 जवान शहीद झाले. त्यांच्या हत्येचा बदला अद्यापि घेतलेला नाही. चीनची अरेरावी कायम आहे. हे जे माजी नौदल अधिकारी आहेत, त्यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता या माजी नौदल अधिकाऱ्य़ाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल', असा सणसणीत टोला शिवसेनेनं लगावला. 'मुंबईत मदन शर्मा नामक एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला, याचे समर्थन कोणी करणार नाही, त्याचा निषेध व्हायलाच हवा; पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमवताय, सुखाने जगताय त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे' असा सणसणीत टोलाही लगावण्यात आला. 'देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह महोदयांनी तातडीने या माजी नौदल अधिकाऱ्य़ाशी फोनवर चर्चा करून त्यांना धीर वगैरे दिला. म्हणजे, जणू काही बाबारे, आपण फार मोठे राष्ट्रीय कार्य केले आहे. परखड सत्य सांगायचेच तर, आज आपण महाराष्ट्राच्या खाल्ल्या ताटात छेद केलात, मुख्यमंत्र्यांचाच अवमान केलात. उद्या मनात आलेच तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तरी चिंता करू नका. तुम्हाला या महान कार्याबद्दल ‘पद्म’ पुरस्कार किंवा विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात येईल. हे असले दळभद्री प्रकार ज्या राज्यात चालविले जातात तो देश जागतिक स्तरावर काय झेप घेणार? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. 'लडाख, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चिंतेचा ‘चिनी’ पारा रोज वाढतो आहे. कश्मिरात आता पाकडे छुपे सर्जिकल स्ट्राइक उघडपणे करू लागले आहेत. अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेच आहेत, पण लॉकडाउन, नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोकं बेरोजगार झाले आहेत. त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत गांभीर्यपूर्वक चर्चा होणार आहे काय? लोकांच्या पोटापाण्याचा, रोजीरोटीचा, शिक्षणाचा, आरोग्याचा विषय राष्ट्रीय पातळीवरच चर्चेला आला पाहिजे, पण देशाच्या सुरक्षेचे, लोकांच्या पोटापाण्याचे विषय अडगळीत ढकलण्यासाठी इतर नको ते विषय उकरून काढले जात आहेत. हा जनताद्रोहच आहे' अशी टीका सेनेनं भाजपवर केली. मध्य प्रदेशच्या सुरैना जिल्ह्यात सत्ताधारी भाजप नेत्याच्या गोळीबारात एक जवान गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे वृत्त कालचेच आहे. याआधी जळगावात भाजपचेच खासदार उन्मेष पाटील यांनी सीमा सुरक्षा दलाचे जवान सोनू महाजन यांचे राहते घर रिकामे करण्यासाठी प्रचंड दहशत निर्माण केली. खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोनू यांच्यावर तलवारीने हल्ला केला. आज माजी नौदल अधिकाऱ्य़ासाठी रस्त्यावर उतरणारे भाजपचे लोक त्यावेळी सोनू महाजन या माजी जवानाच्या बाजूने रस्त्यावर का उतरले नाहीत? असा थेट सवाल सेनेनं भाजपला विचारला. तसचं उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतही आतापर्यंत माजी सैनिकांवर कसे हल्ले झाले ते एकदा तपासून पाहाच. ज्या अखलाखची हत्या गोमांस प्रकरणात झाली, त्याचा मुलगाही देशाच्या लष्करातच सेवा बजावत आहे. 64 वर्षांचे निवृत्त सैन्य अधिकारी कॅ. अमानुल्ला व त्यांच्या पत्नीची घरात घुसून जमावाने हत्या केली, त्यात कॅ. अमानुल्ला ठार झाले. ही घटना भाजपशासित योगी राज्यात अलीकडेच घडली व त्याबद्दल पंतप्रधान, संरक्षणमंत्री साहेबांनी निवृत्त कॅप्टनच्या पत्नीस फोन करून चर्चा वगैरे केल्याचे कधी वाचनात आले नाही' असा टोलाही भाजपला लगावला. 'मागील चोवीस तासांत कर्नाटकात तीन पुजाऱ्य़ांना ठेचून मारण्यात आले, तर उत्तर प्रदेशात मंदिरात जाणाऱ्य़ा पुजाऱ्यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. पालघर येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करणारे आणि त्यांचे मीडियातील ‘हस्तक’ या दोन्ही साधू हत्यांबाबत मात्र गप्प आहेत. भाजपचे लोक रस्त्यांवर उतरून या घटनेचा निषेध करताना चुकूनमाकूनही दिसले नाहीत. कारण हे सर्व नसते उद्योग त्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच राखून ठेवले आहेत.' अशी आठवण करून देत भाजपला टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या