Home /News /news /

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्सव

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्सव

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी.

मुंबई, 01 सप्टेंबर : भव्य देखावे, पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना आणि तेवढच देखणं विसर्जन, समर्पित कार्यकर्त्यांची फौज आणि जोडीला शिस्त आणि उत्तम नियोजन. ही सर्व वैशिष्टय आहेत चेंबुरच्या प्रसिद्ध सह्याद्री क्रीडा मंडळाची. सह्याद्रीचा गणपती म्हणून हा गणपती मुंबईत सर्वदूर प्रसिद्ध आहे. चेंबुरमधल्या टिळकनगरचा  हा लाडका राजा. गणेशोत्सवाच्या काळात या नगरातल्या प्रत्येक घरातला किमान एक तरी सदस्य या मंडळाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असतो. त्यामुळं इथल्या लोकांचं आणि बाप्पाचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालंय. आणि हे नातंच मंडळाच्या यशाचं मुख्य कारण आहे. कुठल्याही मंडळाच्या यशासाठी आवश्यक असतात ते उत्तम कार्यकर्ते, कार्यक्षम कार्यकारी मंडळ, चोख नियोजन आणि त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त. या सर्वच गोष्टींचा मेळ घालून सह्याद्री क्रीडा मंडळाने आपली एक कामाची पद्धत निर्माण केलीय. या कार्यपद्धीमुळेच मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. 1977 मध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना झालीय. यंदाचं मंडळाचं 41 वं वर्ष आहे. गेल्या चार दशकातल्या कामाने या मंडळाने नवीन मंडळांनाही दिशा दिलीय. विसर्जनानंतरच सुरू होते दुसऱ्या वर्षीची तयारी गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांच्या निरोपाचा दिवस हा सगळ्यांनाच हुरहूर लावणारा दिवस असतो. पण तो दिवस गेला की आमच्या डोक्यात सुरू होतात दुसऱ्या वर्षीचे विचार. काय नवं करता येईल. लोकांना काय बघायला आवडेल. याचा विचार सुरू होतो, कार्यकर्तेही हा विचार करायला लागतात हे अभिमानाने सांगत होते सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज. यावरून तुम्हाला इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात येईल. कारण गणेशोत्सवाचं काम हे थकवणारं नसतं तर नवा जोश निर्माण करणारं असतं. आणि गणपती हे सर्वाचं लाडकं दैवत असल्याने तो प्रत्येकाला आपल्यातलाच वाटतो. त्यामुळं काम करण्यासाठी प्रत्येक जण तयार असतो. कार्यकर्त्यांच्या या भावनेतून वाळंज यांनी मंडळाच्या यशाचही गमक सांगून टाकलं. दिवाळीनंतर कामाला वेग दिवाळीच्या आधी कामाचं स्वरूप हे फक्त विचारांच्या पातळीवर असतं. दिवाळी नंतर मंडळाच्या कार्यकारीणीची बैठक होते आणि या बैठकीत सर्व गोष्टींची खुलेपणानं चर्चा होते. यावर्षी कुठला देखावा उभा करायचा. मागच्या वर्षी काय चुका झाल्या. कुठे कमतरता राहिली. काय चांगल्या गोष्टी झाल्या, यावर्षी नवीन काय करता येईल. याचा विचार केला जातो. कार्यकर्त्यांचा एक गट त्यावर सतत विचार करत असतो. त्यांच्याकडून अनेक संकल्पना येत असतात. टिळकनगरमधले नागरिकही त्यांच्या कल्पना सांगतात आणि मंडळही काही गोष्टींवर विचार करते. सर्वांशी चर्चा केल्यानंतर काही संकल्पना निवडल्या जातात आणि त्या निवडक संकल्पनांवर विचार करून पुढच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जातो. भव्य देखावे हे वैशिष्ट्य भव्य आणि सुंदर देखावे हे या मंडळाचं वैशिष्टय आहे. जगप्रसिद्ध मिनाक्षी मंदिर, तिरूपती बालाजी मंदिर, शनिवारवाडा, राजस्थानमधले प्रसिद्ध आणि भव्य मंदिरं, मोठे राजवाडे, वाराणशीची गंगा आरती, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान, मुलांसाठी डिस्नेलँड असे अनेक कल्पक आणि भव्य देखावे मंडळाने आत्तापर्यंत साकारले असून मुंबईकरांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिलाय. एकदा डिस्नेलँड उभरालं असताना शाळकरी मुलांनी त्याला जो प्रचंड प्रतिसाद दिला तो अनुभव अविस्मरणीय असल्याची आठवणही अध्यक्ष राहुल वाळंज यांनी सांगितली. देखावा ठरल्यावर कला दिग्दर्शक निवडून त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. देखावा भव्य, सुंदर आणि हुबेहूब बनावा याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं आहे तो देखावा वेळेत पूर्ण करणं. त्या दृष्टीनेही खास नियोजन करणं. गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी देखावा पूर्ण करून सजावटीच्या अंतिम कामाला पूर्ण रूप दिलं जातं यावर्षी साकारतंय अयोध्येचं राम मंदिर यावर्षी मंडळाने अयोध्येत उभारण्यात येणार असलेल्या प्रस्तावित राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतलाय आणि कामाला सुरूवातही झाली असून देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. दिडशे तंत्रज्ञ आणि कलाकारांची फौज मंदिराचा देखावा साकारण्यासाठी झटत आहे. प्रत्येक बारिक-सारिक गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी कलाकारांना प्रचंड झटावं लागतं. हा देखावा उभारण्यासाठी पूर्णपणे फायबरचा वापर करण्यात येतोय. त्यामुळे पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करण्याकडे मंडळाचा कल असून प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय मंडळाने घेतलाय. गेली दोन महिने हा देखावा साकारण्यासाठी काम सुरू आहे. प्रचंड महेनत आहे. मात्र एकदा देखावा साकारल्यानंतर तो पाहून लोक जेव्हा समाधान आणि आनंद व्यक्त करतात ती सर्वात मोठी कमाई असते. थीमवर आधारीत देखावा आणि नियोजन मंडळाचा दरवर्षीचा देखावा हा एखाद्या थीम वर आधारीत असतो. एकदा थीम ठरल्यानंतर सर्वच गोष्टी त्या प्रमाणात करण्याकडे आणि सजवण्याकडे मंडळाचा कल असतो. निमंत्रण पत्रिकेपासून ते स्मृती चिन्हांपर्यंत आणि पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंपर्यंत तीच थीम वापरली जाते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट त्या प्रमाणात होण्यासाठी कार्यकर्त्यांची एक टीम खास तयारी आणि नियोजन करत असते. प्रत्येक गोष्ट आखीव-रेखीव आणि कल्पक व्हावी यासाठी कार्यकर्ते अनेक कल्पना लढवत असतात. यावर्षी राम मंदिर ही थीमं असल्याने आम्ही प्रत्येक गोष्टीत त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यामुळे सगळीकडे सारखेपणा येतो आणि सौंदयात भरही पडते. दर्शन, शिस्त आणि भक्त मंडळाने उभरलेला भव्य आणि सुंदर देखावा हा प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने बघता यावा यासाठी मंडळ खास काळजी घेते. त्यासाठी गणेशोत्सवाच्या काळातल्या दहा दिवसांचं खास नियोजन केलं जातं. भाविकांची गर्दी कितीही वाढली तरी प्रत्येकाला शांतपणे दर्शन घेत पुढे जाता यावं याची व्यवस्था करण्यात येते. अतिमहत्वांच्या व्यक्तिंचा राबता असल्याने त्यांच्या दर्शन मार्गाची वेगळी व्यवस्था केली जाते. मात्र या काळात दर्शन थांबवलं जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची दर्शन रांग सुरळीत राहते आणि मान्यवरांनाही गर्दीचा त्रास होत नाही. प्रत्येकाला दर्शन झाल्यावर प्रसाद मिळेल याचीही काळजी घेतली जाते. शाळेतली मुलं येणार असतील तर त्या प्रत्येकाला काही भेटवस्तू मिळेल याची मंडळ काळजी घेते. या नियोजन आणि उत्तम व्यवस्थापनामुळं चोविस तास दर्शन सुरू असलं तरी कुठेही गडबड गोंधळ होत नाही आणि भाविकांनाही शांतपणे दर्शन घेतल्याच आनंद मिळतो. पारंपरिक मिरवणूकच, नो डीजे, नो डान्स गणेशोत्सवाला सध्या अत्यंत कर्कश्य स्वरूप आलंय. डीजेंचा दणदणाट, थिरकत्या चालींच्या गाण्यांवर बेभाण नाचणं, कान फाडणारे मोठ्या आवाजांचे फटाके यामुळं गणेशोत्सवाचं मांगल्य हरवून गेलंय. अशी परिस्थिती असताना  सह्याद्री क्रीडा मंडळाने घालून दिलेली पद्धत सर्व मंडळांनी अनुकरण करावी अशी आहे. डीजे, फटाके, बेभान नाचणं अशा सगळ्या गोष्टींना इथे कुठलाही थारा नाही. बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक किंवा विसर्जनाची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीनेच काढण्याचा मंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे मुरवणूकीत फक्त पारंपरिक ढोल ताश्यांचाच वापर केला जातो. त्यामुळं उत्सवातलं मांगल्य अजूनही टिकून आहे. यापुढेही हीच परंपरा टिकवण्याकडे मंडळातल्या सर्वाचंच एकमत आहे. अशीच सुबुद्धी सर्वांनाच मिळाली तर गणेशोत्सवाचं स्वरूप बदलल्याशीवाय राहणार नाही.          
First published:

Tags: Ganeshotsav management, Gneshstave, Sahyadri krida mandal chembur, गणेशोत्सव, गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट, सह्याद्री क्रीडा मंडळ

पुढील बातम्या