हिवरा आश्रमाची माघार, मराठी साहित्य संमेलन आता बडोद्यात ?

हिवरा आश्रमाची माघार, मराठी साहित्य संमेलन आता बडोद्यात ?

बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा इथल्या विवेकानंद आश्रमात होणारं 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बारगळलं आहे. इथं साहित्य संमेलन भरवण्यासंदर्भात विदर्भ साहित्य परिषदेने दिलेला प्रस्ताव मागे घेतलाय. त्यामुळे आता बडोद्यात हे साहित्य संमेलन होईल याची शक्यता अधिक बळावली आहे.

  • Share this:

बुलढाणा, 14 सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा इथल्या विवेकानंद आश्रमात होणारं 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बारगळलं आहे. इथं साहित्य संमेलन भरवण्यासंदर्भात विदर्भ साहित्य परिषदेने दिलेला प्रस्ताव मागे घेतलाय. त्यामुळे आता बडोद्यात हे साहित्य संमेलन होईल याची शक्यता अधिक बळावली आहे. यापूर्वी दिल्ली, बडोदा या दोन्ही साहित्य परिषदेने संमेलन भरवण्याचे प्रस्ताव दिले होते. परंतु, साहित्य महामंडळानं विदर्भ साहित्य परिषदेने दिलेला प्रस्ताव स्वीकारत बुलढाणा जिल्ह्यात हे संमेलन भरवण्याबाबत निर्णय घेतला होता. पण जेव्हा संमेलन स्थळावरुन महाराष्ट्रात वाद वाढले.

विशेषतः श्याम मानव यांच्या 'अंनिस' संघटनेनं या आश्रमात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आरोप करत तिथं साहित्य संमेलन भरवायला तीव्र विरोध केला. काही नामवंत साहित्यिकांनीही बुलढाण्यातल्या नियोजित संमेलनस्थळाला विरोध केला. त्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज दुपारी बडोदा साहित्य परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांना फोन करुन संमेलन भरवण्यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी होकार कळवल्यानंतर विदर्भ साहित्य परिषदेला संमेलनाचा प्रस्ताव मागे घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या, अशी सूत्रांची माहिती आहे.

आता 91 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोद्यात होण्याची शक्यता बळावली असून, तिथल्या संमेलन स्थळाला राजे सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी असं दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. आता साहित्य महामंडळ बडोद्याचा प्रस्ताव मान्य करुन साहित्य संमेलन भरवण्याची परवानगी देतं का हे पाहावं लागेल.

अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका

"वादग्रस्त शुकदास महाराज यांच्या हिवरा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) आश्रमात होणारे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव निमंत्रक संस्थेच्या अध्यक्ष्यांनी मागे घेतल्यामुळे हे संमेलन आता शुकदास आश्रमात होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक हा निर्णय अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने जाहीर केला असता तर तो साहित्य वर्तुळाच्या प्रतिष्ठेला आणि नैतिकतेला शोभेसा ठरला असता. तसे झाले असते तर आम्हाला आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया अ.भा. अंनिसचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी आज दिली.

या निर्णयामुळे हिवरा आश्रम, शुकदास आणि सदर साहित्य संमेलन हे विषय आमच्यासाठी तात्पुरते संपले आहेत. साहित्य संमेलन जिथे होईल ते उत्तम पद्धतीने पार पडावे, अशी आमची सदिच्छा आहे. आमचा केवळ हिवरा आश्रम या संमेलन स्थळाला विरोध होता बुलडाणा जिल्ह्यात अन्यत्र हे संमेलन व्हायला हवे असे अंनिसचे मत आहे, हे कृपया रसिकांनी लक्षात घ्यावे, असेही आवाहन प्रा. मानव यांनी आज जारी केलेल्या पत्रकात केले आहे."

First published: September 14, 2017, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading