News18 Lokmat

मी कुणाचा गुलाम बनून राहणार नाही - सदाभाऊ खोत

''माझ्या विरुद्ध राजू शेट्टीनी काही कार्यकर्त्यांना उभं करून गरळ ओकायला लावलीय, माझ्याविरूद्ध नेमलेली चौकशी समितीही निव्वळ दिखाऊपणा आहे'', असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2017 06:37 PM IST

मी कुणाचा गुलाम बनून राहणार नाही - सदाभाऊ खोत

सांगली, 4 जुलै : सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधला तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय... कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत बोलताना राजू शेट्टींवर पुन्हा निशाणा साधलाय. ''माझ्या विरुद्ध राजू शेट्टीनी काही कार्यकर्त्यांना उभं करून गरळ ओकायला लावलीय, माझ्याविरूद्ध नेमलेली चौकशी समितीही निव्वळ दिखाऊपणा आहे'', असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. दरम्यान, आज पुण्यात होणाऱ्या चौकशी समितीच्या सुनावणीला सदाभाऊंनी दांडी मारल्याने हीच सुनावणी आता 21 जुलै रोजी होणार आहे. त्यादिवशीच मी माझं म्हणणं मांडणार आहे. चौकशी समितीने माझ्याकडे 26 प्रश्नांची यादी पाठवल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. मी आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद हा वैयक्तिक पातळीवरचा असून तो संघटनेच्या पातळीवर नेण्याची काहीच गरज नव्हती, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.

''मी खांद्याला खांदा लावून मी काम करणारा कार्यकता आहे. पण काही लोकांच्या सांगण्यावरून आमच्यात दुरावा निर्माण झाला आहे. ज्या वेळी शरद जोशी यांनी भाजप बरोबर युती केली त्यावेळी राजू शेट्टी बंड केलंच की, त्यामुळे जो माणूस शरद जोशीच्या विचारांना धुडकावतो त्याला सदाभाऊला धुडकावायला किती वेळ लागणार ? असाही उपहासात्मक टोला खोत यांनी लगावलाय. ''राजू शेट्टींना महात्मा व्हायचं आहे त्यामुळे सदाभाऊला हुतात्मा करायचं आधीचं ठरवलं गेलंय, त्यासाठीच सोशल मीडियातून माझ्याविरूद्ध बदनामीची मोहीम चालवली जातेय. माझ्यावर दोषारोप ठेवणाऱ्यांनी एक बोट माझ्याकडे दाखवले तर तीन बोटं आपल्याकडेही आहेत याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं असतं तर व्यक्तिगत भांडण चव्हाट्यावर आलं नसतं, मी लढणारा माणूस आहे, सदाभाऊ गुलाम म्हणून रहावा असं कोणाला वाटत असेल तर मी ते कदापिही हे सहन करणार नाही'', असंही सदाभाऊंनी म्हटलंय. त्यामुळे सदाभाऊ खोत स्वाभिमानी संघटनेत राहणार की नाही याचा फैसला आता 21 जुलैलाच होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...