अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद ; सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्रं

अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद ; सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्रं

'चंद्रकांत दादांचेही गांडो थयो छे' या शीर्षकाखाली सामनातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आलंय. केवळ अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद मिळाल्याची बोचरी टीका या अग्रलेखातून करण्यात आलीय.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : रस्त्यावरील आंदोलनावरून शिवसेनेला डिवचणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्रं सोडण्यात आलंय. 'चंद्रकांत दादांचेही गांडो थयो छे' या शीर्षकाखाली सामनातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आलंय. केवळ अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद मिळाल्याची बोचरी टीका या अग्रलेखातून करण्यात आलीय. तसंच शिवसेना ही फसवाफसवी करून सत्ता भोगत नाही.. तुम्हीच सध्या हवेत तरंगताय, आम्ही जमिनीवर आहोत. कर्जमाफी म्हणजे निव्वळ नाटकच आहे. राज्यकर्ते नालायक ठरल्यानेच शिवसेना रस्त्यावर उतरलीय, असा जोरदार हल्ला सामनामधून भाजपवर चढवण्यात आलाय.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात ?

शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील हे तसे बरे गृहस्थ आहेत व त्यांचे अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच ते आज महसूलमंत्री पदावर आहेत. तसेच भावी मुख्यमंत्री म्हणूनदेखील ते सदैव शर्यतीत आहेत. आम्ही त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देत आहोत, पण मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या एकनाथ खडसे यांची सध्या काय अवस्था झाली आहे याचा अभ्यासही चंद्रकांतदादांनी करायला हवा अशी सूचना एक हितचिंतक म्हणून आम्ही करीत आहोत.

राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टी

झाल्यानेच त्यांना महागाईविरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत. अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत असे सांगून सत्तेत आल्यावरही ते अच्छे दिन काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत. मात्र ती जबाबदारी पार पाडण्यास राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. जनतेचे आशीर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा गांडो थयो छे! बरोबर ना, चंद्रकांतदादा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 10:30 AM IST

ताज्या बातम्या