मॉस्को, 9 जून : कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे जगभरातील नागरिकांना काम बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यामध्ये प्रत्येक जण विविध प्रकारे आपला निषेध व्यक्त करत आहे.
अशातच रशियातील रेस्टॉरंट मालक आणि शेफ यांनी मिळून एक कॅम्पेन सुरू केलं आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून ते व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागत आहे. यासाठी त्यानी नग्न फोटोशूट करीत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शेकडो बार, रेस्टॉरंट आणि कॅफेच्या कर्मचार्यांनी काळजीपूर्वक स्थितीत प्लेट्स, कप, सॉसपॅन, बाटल्या, बार स्टूल आणि नॅपकिनसह स्वत:चे नग्न फोटो पोस्ट केले आहेत. कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी देश हळूहळू उपाययोजना सुलभ करीत असल्याने अधिकाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देण्याची परवानगी द्यावी ही त्यांची मागणी आहे.
काझान शहरातील रेलाब फॅमिली बार साखळीचे मालक आर्थर गॅलाच्युक म्हणाले “आम्ही नग्न आहोत कारण आमच्याकडे काहीही शिल्लक नाही.” यांच्या २० सहकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊननंतर 11 जून रोजी काझानमधील गच्चीवरील रेस्टॉरंट्सना सुरू परवानगी देण्यात येणार आहे.
"आम्हाला स्ट्रिप शो काढून कोणालाही त्रास द्यायचा नाही, आम्हाला फक्त एक गोष्ट हवी आहे, आम्हाला काम करायचं!" अशी भावना सायबेरियन शहरातील शेफने व्यक्त केली. त्याने ही आपल्या सहका-यांसह मास्क घातलेले फोटो पोस्ट केले आहे.“सुपरमार्केट, शॉपिंग मॉल्स, हेअर सॅलून किंवा सार्वजनिक वाहतूक यापुढे आम्हाला जास्त धोका नाही,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. नोव्होसिबिर्स्कमधील अधिकाऱ्यांनी स्थानिक रेस्टॉरंट्स केव्हा उघडणार याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. WION ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
रशियाची राजधानी 23 जूनपासून पूर्णपणे उघडण्याच्या तयारीत आहे. कॅफे आणि रेस्टॉरंट्सना बाहेरचे टेरेस उघडण्याची परवानगी देण्याची योजना आखली जात आहे. रशियाच्या इतर भागात इंडोर रेस्टॉरंट्स आणि बार बंद आहेत.
हे वाचा-कधी भजी.. कधी फालुदा, लॉकडाऊनमध्ये खाण्यावर होता जोर; LPG च्या खपात झाली वाढ