Home /News /news /

Russia-Ukraine War: जगावर अण्वस्त्र हल्ल्याचं मोठं संकट? युक्रेनवर हल्ल्याबाबत पुतीन म्हणाले...

Russia-Ukraine War: जगावर अण्वस्त्र हल्ल्याचं मोठं संकट? युक्रेनवर हल्ल्याबाबत पुतीन म्हणाले...

आता 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणावा अशी परिस्थिती उद्भवली आहे. तसे संकेत देणारं वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे.

    मुंबई, 20 जून:   रशियाने युक्रेनविरोधात (Russia-Ukraine War) पुकारलेल्या युद्धाला आता चार महिने होऊन गेले आहेत. त्यात युक्रेनचं तर स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहेच. शिवाय रशियाचंही नुकसान झालं आहे. युद्धामुळे केवळ त्या दोन देशांवरच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांवर विपरीत परिणाम झाले. मुख्यत्वेकरून व्यापार-उद्योगांवर परिणाम झाल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यातच आता 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणावा अशी परिस्थिती उद्भवली आहे. तसे संकेत देणारं वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे. त्यामुळे सगळे देश त्या वक्तव्याचे अर्थ लावत असून, तो चिंतेत पाडणारा आहे. 'डेलीस्टार'च्या हवाल्याने 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. युद्धात आतापर्यंत रशियाने अनेक घातक अस्त्रं-शस्त्रांचा वापर केला असला, तरी अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्रांचा मात्र आतापर्यंत विषयही निघाला नव्हता. आता मात्र पुतीन यांनी तो विषय काढला आहे. 'आम्ही कोणालाही अण्वस्त्रांच्या हल्ल्याची (Nuclear War) धमकी देत नाही आहोत; मात्र सर्वांना आम्ही आठवण जरूर करून देऊ इच्छितो, की आमच्याकडे अण्वस्त्रं आहेत. एवढंच नव्हे, तर आम्ही त्या अण्वस्त्रांचा वापरही करू शकतो,' असं वक्तव्य व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी केलं आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतीन यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, त्यामुळे वातावरण चिंताजनक बनलं आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, अशी शंका आधीच वर्तवली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी हे वक्तव्य केल्याने ते खरोखरच अण्वस्त्रं वापरतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाने बदललं जग! वाचा तुमच्या आमच्यावरही काय होणार परिणाम पुतीन यांनी आधीही अनेकदा अण्वस्त्रवापराची धमकी दिली आहे; मात्र या वेळी त्यांनी वक्तव्य करतानाच 'आम्ही कोणाला धमकी देत नाही आहोत; पण आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत आणि ती वापरण्यास सक्षम आहोत,' असं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक फोरमवरून (International Economic Forum) त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे युक्रेनच्या पूर्वेकडच्या भागाला फार मोठा धक्का बसला आहे. तिथल्या कित्येक नागरिकांचा जीव गेला असून, युक्रेनची अनेक शहर पुरती उद्ध्वस्त झाली आहेत. एवढं होऊनही युद्ध अद्याप निर्णायक स्थितीत आलेलं नाही. युक्रेन आता युरोपीय महासंघात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब रशियाच्या दृष्टीने धक्कादायक मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुतीन यांच्या अण्वस्त्रांबद्दलच्या वक्तव्यामुळे साऱ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं आहे. 'आमच्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्याची वेळ आली, तर आम्ही अजिबात मागे-पुढे पाहणार नाही,' असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. ही 'धमकी' नसल्याचं त्यांनी म्हटलं असलं, तरी ती धमकीच असल्याचा गर्भितार्थ दिसून येत आहे. फेब्रुवारीत जेव्हा रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं, तेव्हाच आपल्या अण्वस्त्र हाताळणाऱ्या टीमलाही सक्रिय केलं होतं, जेणेकरून आवश्यकता भासल्यास अण्वस्त्रांचा वापर केव्हाही करता येऊ शकेल. त्यामुळेच पुतीन यांच्या वक्तव्याकडे सारे जण गांभीर्याने पाहत आहेत.
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin, World news

    पुढील बातम्या