हैदराबाद, 1 मे : सरकारनं स्पुतनिक व्ही या रशियन लसीला परवानगी दिल्यानंतर शनिवारी दुपारी भारतात या लशींची पहिले खेप पोहोचली आहे. शनिवारी दुपारी हैदराबादेत स्पुतनिक व्ही लसींचे डोस घेऊन आलेलं विमान दाखल झालं. त्यामुळं भारतातल्या लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे.
केंद्र सरकारने 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र लसींच्या तुटवड्यामुळं संपूर्ण देशभरात अपेक्षित वेगानं ही लसीकरण मोहीम सुरू झाली नाही. अनेक राज्यांमध्ये तर 45 वर्षांपुढील वयोगटाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीही लसीचे डोस उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा परिस्थितीत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस येण्याची सर्वजण वाट पाहत होते. शनिवारी दुपारी या डोसची पहिली खेप हैदराबादेत दाखल झाली आहे.
#WATCH The first consignment of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad pic.twitter.com/PqH3vN6ytg
— ANI (@ANI) May 1, 2021
रशियाच्या मॉस्कोमधल्या (Moscow) गामालेय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुतनिक V ही लस विकसित केली आहे. रशियात ऑगस्ट 2020 मध्ये गॅम-कोविड-व्हॅक(Gam-Covid Vac) या नावाने तिची नोंदणी झाली आहे.
(वाचा-बायको म्हणाली म्हणून विकले दागिने, सुरू केली गरजूंसाठी मोफत ऑक्सिजन सेवा)
किती प्रभावी?
स्पुतनिक V ही लस कोरोनाप्रतिबंधासाठी 91.5 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या लशींनंतर सर्वाधिक प्रभावी लस म्हणून स्पुतनिक V या लशीचा नंबर लागतो. भारतात या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याआधीही चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
(वाचा-विहीर हरवली हो..! अनाड गावची अजब कहाणी, शेतकऱ्यानं केली तक्रार)
भारतातही उत्पादन
स्पुतनिक V लशीच्या ब्रिज क्लिनिकल ट्रायल्स भारतात घेण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने (Dr. Reddy's Laboratory) रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाशी करार केला होता. ती कंपनी या लशीचे 25कोटी डोसेस भारतात देणार असल्याचं वृत्त आहे. ग्लॅंड फार्मा, हेटेरो बायोफार्मा, स्टेलिस बायोफार्मा, व्हरचौ बायोटेक आणि पॅनाशिया बायोटेक या कंपन्यांशी RDIF ने उत्पादनाचे करार केले आहेत. या कंपन्या 85कोटींहून अधिक डोसेसची भारतात निर्मिती करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Vaccine