मुंबई, 14 फेब्रुवारी : संपूर्ण जगभरात आज Valentine Day साजरा करण्यात येत आहे. अनेकजण आज आपल्या प्रेमाची कबुली देतात. या दिवसाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एका खास पद्धतीने साजरा केला आहे. रोहित पवारांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक हटके ट्वीट केलं आहे ज्याची चांगलीच राजकीय चर्चा सुरू आहे. 'हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे' असं म्हणत त्यांनी ट्वीटची सुरुवात केली पण त्यानंतर असं केंद्र सरकारला चांगलाच टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
आजच्या प्रेमाच्या दिवशी सगळेजण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करतं. पण तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
काय लिहलं आहे ट्वीटमध्ये...
'हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.'
खरंतर गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2020
महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.
रोहित पवारांची आमदारकी धोक्यात?
माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी 14 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते.
मतदारांमध्ये पैशांचे वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.