मुंबई, 18 जून : मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला आहे. तर सुशांतची मॅनेजर श्रुतीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. रिया चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार तिने सुशांतबद्दल जे माहित होतं ते तिने पोलिसांना सांगितलं आहे. तब्बल 10 तासांपर्यंत रियाची वांद्रे पोलीस चौकशी करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी झाल्यानंतर माध्यमांनी सुशांतच्या आत्महत्येसंर्भात रियाला प्रश्न विचारले असता तिने कोणतंही उत्तर न देता हात जोडले आणि निघून गेली. रियाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी सुशांतबरोबर झालेल्या सर्व सिनेमांच्या कराराची प्रत मागवली असून त्यानुसार पुढील तपास करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी आणि पीआर टीममधून राधिका निहलानी यांचाही जबाब नोंदवला आहे. श्रुतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जुलै 2019 ते 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत सुशांतसोबत होती आणि छिचोरे सिनेमांच्या प्रमोशनमध्येही सोबत होती. सुशांत हा बॉलीवूडपेक्षा खूप वेगळा होता.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यात प्रसिद्ध टीव्ही प्रोड्यूसर विकास गुप्ता (Vikas Gupta)यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून विकास गुप्ता यांनी सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यामधील नात्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
विकास गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो खूप जुना आहे. फोटोत सुशांत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत दिसत आहे. सुशांत आणि अंकिता 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सोबत काम करत होते. तेव्हाचा हा फोटो असावा. विकास यांनी या फोटोसोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. सुशांतच्या आयुष्यात अंकिता लोखंडेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं, हे सांगण्याची प्रयत्न विकास गुप्ता यांनी या पोस्टमधून केला आहे.