रत्नागिरी 08 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. हे गृहस्थ 17 मार्चला दुबईहून आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. नंतर त्यांना खेडच्या कळंबणी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. त्यामुळे खेड मधील अलसुरे गाव सील करण्यात आले आहे. त्यांना 6 एप्रिलला कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाने बाधित रुग्णाप्रमाणे शासकीय नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मुंबई हा फक्त राज्याचाच नाही तर देशाचा कोरोना हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 106 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 696 एवढी झालीय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 झाली आहे. आज एकाही रुग्णाला सुट्टी देण्यात आलेली नाही. आत्तापर्यंत एकूण 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण संशयितांसह 313 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आतापर्यंत 11 हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. राज्यातल्या आजच्या बाधितांची संख्या 117 असून राज्यात 1135 एकूण बाधित रुग्ण झाले आहेत.
कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
लढा जिंकूच! ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, 55 मिनिटांत लागणार निकाल
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू!
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. सध्या राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे. गुणाकार होताना दिसत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यात बुधवारी 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - आशेचा किरण! देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही
अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांच्या तुलनेत देशात कोरोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. मात्र, सुदैवाने तसे होत नाही आहे. देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या 5000 दरम्यान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.