बीड, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक घरात बसूनच आहेत. अशात हाताला काम नसल्याने सरकारकडून गोर गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य देण्यात येतं आहे. माञ, बीडमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे रेशन मागण्यासाठी गेलेल्या दोन कुटुंबांना दुकानदार आणि त्याच्या परिवाराकडून लाकडी काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
गेवराई तालुक्यातील नांदलगाव इथं गेल्या चार दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदार सुनील राऊत यांच्याकडे रेशनची मागणी होत होती. अनेक वेळा चकरा मारून देखील रेशन न मिळाल्याने विष्णू गाडे, प्रभू गाडे या दोन भावंडांनी जाब विचारला.
आपल्याला सारखा जाब विचारता या रागातून स्वस्त धान्य दुकानदाराने दोन्ही भावंडावर हल्ला केला. लाकडी काठ्याने या दोन्ही भावांना मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनीही या दुकानदारावर हल्ला चढवला. यावेळी दुकानदाराचे कुटुंब आणि नागरिकांमध्ये भररस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाली.
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध तलवाडा पोलिसात तक्रार देण्यात आली असून, अद्याप मुजोर दुकानदारावर कसलीच कारवाई झाली नाही.
हेही वाचा -पुणेकरांचे रक्षक कोरोनाच्या टार्गेटवर, आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना झाली लागण
शासकीय नियमानुसार, सर्व गरजू नागरिकांना रेशन दुकानावर तांदूळ आणि गहू वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पण, तरीही काही मुजोर रेशन दुकानदारांची अरेरावी सुरूच आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.