खेड, 23 एप्रिल : नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी हे दाखवून दिलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली आली आहे. यावेळी कोरोना भरारी पथकाच्या शासकीय वाहनातून जाणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मास्क न लावता तोंडात गुटखा खाताना डीवायएसपी प्रवीण पाटील यांनी पाहिले.
पोलिसांना ती गाडी थांबवायला सांगितले. हे दोघेही शासकीय कर्मचारी गाडीतून उतरले आणि पुन्हा रस्त्यावर थुंकले. हे पाहून डीवायएसपी पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या चांगल्याच संतापल्या.
आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य खबरदारी घेण्यासाठी स्वच्छता बाळगण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. पण, शासकीय कर्मचारीच असे वागत असल्यामुळे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा - कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर
त्यानंतर पाटील यांनी गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्वांसमोर त्याच्याच हात रुमालाने रस्त्या साफ करायला लावले. कर्मचाऱ्याने आधी यास नकार दिला. पण, पोलिसांनी दरडावून सांगितल्यावर या कर्मचाऱ्याला आपण थुंकलेल्या गुटखा साफ करावाच लागला.
तसेच जिल्ह्यात थुंकण्यास देखील बंदी असल्याने आणि तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. याचे गांभीर्य सांगून या दोन्ही कर्मचाऱ्यांना समज देत नंतर सोडण्यात आले. घडलेला हा सगळा प्रकार तिथे उपस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.