उदयनराजेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी घेतली भेट, चर्चेनंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 01:40 PM IST

उदयनराजेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी घेतली  भेट, चर्चेनंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

सातारा, 4 सप्टेंबर : राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेतली.

'विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली आहे. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे आता नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.

राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठीही नाही सोपं

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

Loading...

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अन्य काही नावं चर्चेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादी दुसऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SPECIAL REPORT : आजोबांसाठी नातू सरसावला, थेट अमित शहांवर सोडलं टीकास्त्र!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...