दौसा (राजस्थान), 16 डिसेंबर : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तीन तरुणांनी मिळून एकाची मारहाण केल्याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओत हे तरुण त्याला काठीनं बेदम मारत असल्याचं दिसत आहेत.
काय आहे प्रकरण?
राजस्थानातील (Rajasthan) दौसा (Dausa) या गावातला हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित सैनी असं मारहाण झालेल्या पीडित तरुणाचं नाव आहे. रोहित गावातील एका मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्या मंदिराच्या बाहेर असलेल्या एका टवाळ तरुणांच्या टोळक्यानं त्याच्याकडं दारुसाठी पैसे मागितले. रोहितने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी रोहितला बेदम मारहाण केली. या मारहाणीपासून वाचण्यासठी रोहित अक्षरश: सैरावैरा मैदानात पळत होता. धक्कादायक बाब म्हणजे रोहितला होत असलेली मारहाण अनेक जण मूकपणे पाहत होते. त्यापैकी एकानंही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
हे वाचा-प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं छातीत झाडली गोळी, पुण्यातील धक्कादायक घटना
रोहित या मारहाणीत जखमी झाला आहे. त्याने या प्रकरणाची पोलिसांकडं तक्रार केली आहे. मात्र गावातील मंदिराच्या बाहेर भर दुपारी एका तरुणाला मारहाण करणाऱ्या मस्तवाल टोळक्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. या तरुणांचे चेहरे देखील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता या तरुणांवर लवकरात लवकर कठोर करण्याची मागणी केली जात आहे.